कुंकू लावताच आजार बरा, पुण्यात मोनाली विधातेंकडून अंधश्रद्धेचा बाजार? तृप्ती देसाईंच्या आरोपांनी प्रकरणाला वेगळं वळण!

एक व्हिडीओ पुण्यामधून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रुग्णांच्या कपाळावर केवळ कुंकू लावून त्यांचे गंभीर आजार बरे करत असल्याचा दावा करताना दिसत आहे. यावर आता तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

कुंकू लावताच आजार बरा, पुण्यात मोनाली विधातेंकडून अंधश्रद्धेचा बाजार? तृप्ती देसाईंच्या आरोपांनी प्रकरणाला वेगळं वळण!
Trupti Desai
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 7:40 PM

पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचे प्रकार वारंवार समोर येतच आहेत, आता असाच एक व्हिडीओ पुण्यामधून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रुग्णांच्या कपाळावर केवळ कुंकू लावून त्यांचे गंभीर आजार बरे करत असल्याचा दावा करताना दिसत आहे. मोनाली विधाते असं या महिलेचं नाव आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर आता या व्हिडीओ प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रेखा कोंडे यांनी या प्रकरणात पोलिसांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी  केली आहे. दरम्यान रेखा कोंडे यांनी केलेल्या आरोपांनंतर आता मोनाली विधाते यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाल्या विधाते? 

आई साहेबांच्या कृपेने त्यांना फरक पडतो. आईसाहेबांना ते नवस बोलतात, त्यांचा नवस पूर्ण झाल्याच्यानंतर ते आईसाहेबांना ओटी घेऊन येतात. रेखाताईंना मी सांगू इच्छिते की हे खूप चुकीचं आहे. तो व्हिडीओ गेल्या वर्षी टाकलेला आहे. एक महिला एका महिलेला कुंकूच लावणार ना? त्या माझ्या  बदनामीच्या हेतूने बोलत आहेत. आमची तिसरी पिढी हे धार्मिक काम करते. आजी गेल्यानंतर मला आईसाहेबांचा संचार झाला. भक्तगण आशेने येतात त्यांचं काम होतं म्हणून येतात. मार्गदर्शन खूप छान पद्धतीने करते, बऱ्याच जणांना फरक पडला आहे. लहान मुलांना इथपर्यंत घेऊन या असे मी कधीच म्हणाले नाही. डॉक्टरांची गरज सर्वांना आहे, मला ही गरज आहे. मी कुणाकडून काही घेत नाही ज्यांचं काम होतं ते इथ ठेवतात.काही सोनं माझं ओरिजनल आहे काही सोनं ग्रॅमच आहे, अशी प्रतिक्रिया मोनाली विधाते यांनी या आरोपांवर दिली होती,  दरम्यान त्यानंतर आता तृप्ती देसाई यांनी देखील मोनाली विधाते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाल्या तृप्ती देसाई?

पुरुष भोंदूगिरी करतात तसं महिलाही भोंदूगिरी करतात, मोनाली विधाते ही मोनाली वाव्हळ आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. २०१६ मध्ये आमच्या आंदोलनामध्ये मोनाली विधाते या सहभागी व्हायच्या. त्यावेळी पोलिसांनी मला सांगितलं होतं, हिची पार्श्वभूमीव बरोबर नाही. त्यानंतर  मोनाली वाव्हळ अचानक मोनाली विधाते झाली, तिच्याकडे घालण्यासाठी ड्रेस नव्हते आता तिच्याकडे चार किलो सोनं आहे. तिच्याकडे मर्सिडीज गाडी आहे, आम्ही इतकी वर्ष झाली, काम करतो  पण आमच्याकडे काही नाही. मग तुम्ही असं काय काम करता? की तुम्ही मर्सिडीज गाडी घेता?  तुम्ही लोकांना लुटण्याचं काम करत आहात,  मोनाली विधाते या धादांत खोटं बोलत आहेत. भक्तांना लुटत आहेत. यांच्यावरती तातडीने कारवाई होण गरजेचं आहे.  रिल स्टार सोनं घालणारे हे फ्रॉड लोक आहेत. पुण्यातील पोलीस आयुक्तांनी यांच्या वरती तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता तृप्ती देसाई यांच्या आरोपांना विधाते काय उत्तर देणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us