कॉकरोच काय असतं हे…तुकाराम मुंढेंचं थेट विधान, असं काही बोलले की टाळ्यांचा कडकडाट!

आएयएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी 'कॉकरोच'बद्दल एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

कॉकरोच काय असतं हे...तुकाराम मुंढेंचं थेट विधान, असं काही बोलले की टाळ्यांचा कडकडाट!
tukaram mundhe and cockroach protest
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2026 | 6:37 PM

Tukaram Mundhe on Cockroach : आएयएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात खाद्यपदार्थांत भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई चालू केलेली आहे. त्यांनी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना चांगले जेवण कसे द्यावे, यासाठी काही नियमच घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिलाय. दरम्यान, हेच तुकाराम मुंडे आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी ‘कॉकरोच’वर अशी एक प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आहे.

कॉकरोचबद्दल तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?

‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांनी मुंढे यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना तुकाराम मुंढे यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. प्रशांत आहेर यांनी याच मुलाखतीदरम्यान कॉकरोचवर प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर तुकाराम मुंढे यांनी एका वाक्यात उत्तर दिले. या उत्तरानंतर उपस्थितांनी मात्र टाळ्या वाजवल्या. उच्च न्यायालयाच्या कँन्टीनवरही तुम्ही छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान एखादा कॉकरोच निघाला तर त्याला काय होतं, असं कँन्टीनचा चालक म्हणाला नाही का? असा प्रश्न आहेर यांनी विचारला. याच प्रश्नाचे उत्तर देताना तुकाराम मुंढे यांनी ‘कॉकरोच काय असतं हे आपल्याला पाठीमागच्या काही दिवसात कळलं आहे. कॉकरोचचं असं आहे की त्याला कुठेही फेका तो तिथेच जन्म घेतो,’ असं खुमासदार उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तसेच पुढे बोलताना उच्च न्यायालयातील कॅन्टीवर झालेली छापेमारी ही न्यायालयाच्याच निर्देशानुसार होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘अटेंशन स्पॅन’ अवघ्या आठ सेकंदाचा झाला

तुकाराम मुंढे यांनी पुढे तरुणाईलाही काही मोलाचे सल्ले दिले. ‘फक्त यशाकडे पाहू नका, तर अपयशातूनही शिकण्याचा प्रयत्न करा. कोणाचे अंधानुकरण करू नका, तर प्रत्येकाकडून चांगले गुण शिका आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. डिजिटल युगात तरुण पिढीचा ‘अटेंशन स्पॅन’ अवघ्या आठ सेकंदाचा झाला आहे आणि स्क्रीन टाइम ८-९ तासांवर गेला आहे. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करू नका, तर विचार करा. कष्टाची तयारी ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. प्रवाहातील लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे वाहून न जाता जिवंत माणसाप्रमाणे ध्येयाकडे वाटचाल करा. परिस्थिती कशीही असली, तरी तुमचे भविष्य हे तुम्ही आज घेतलेल्या निर्णयांवरच अवलंबून असते,’ असा मोलाचा संदेश तुकाराम मुंढे यांनी दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us