
नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली असून देशभरात मोठा उत्साह बघायला मिळत आहे. आता दांडियाला देखील आजपासून सुरूवात होईल. राज्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊल सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा इशारा पावसाचा दिलाय. सतत पाऊस सुरू आहे. शेतपिकांचे देखील मोठे नुकसान झाले. सधया राज्यात ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण यावरून मोठा वाद पेटल्याचे बघायला मिळत आहे. काल गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात पोहोचले असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर आज महत्वाच्या काही घडामोडी घडू शकतात. भारत-पाकिस्तान सामन्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेचे पडसाद देशभर बघायला मिळत आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवी गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली. आज नवरात्रोत्सवाची पहिली माळ असल्याने राज्यभरातील भाविक दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर.
परंडा ते कुर्डुवाडी रस्त्यावरील आवारपिंपरी रोडवरील पुलावर पाणी
आवारपिंपरी येथील उल्फा नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने कुर्डूवाडीकडे जाणारी वाहतूक बंद
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी
बीडला अतिमुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे, नांदूर हवेलीला सिंदफणा नदीच्या पुराचा वेढा पडला आहे. या पुराच्या पाण्यात 24 लोक अडकले आहेत. NDRF ची एक टिम देखील दाखल झाली आहे, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे.
जळगाव तालुक्यातील बोरनार परिसरात मुसळधार पावसामुळे गावानजीक असलेला सौर ऊर्जा प्रकल्प पाण्यात बुडाला आहे. या प्रकल्पातील काही सौर ऊर्जेच्या प्लेट देखील वाहून गेल्या असून, मोठं नुकसान झालं आहे. मध्यरात्री या परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.
धाराशीवमधील भूम तालुक्यातील बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. पुरात शेतकऱ्याच्या 17 दुभत्या गाईंचा मृत्यू झालाय. तर 10 गाई वाहून गेल्या.
बेलगाव पिंपळगाव येथील शेतकरी विश्वास दातखिळे यांच्या 17 गाईंचा पुराच्या पाण्याने मृत्यू झालाय. तर दहा गाई वाहून गेल्या. तसेच काही शेळ्या देखील वाहून गेल्या आहेत.
पुण्यातील जेष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणप्रेमी डॉ हेमा साने अनंतात विलीन झाल्या आहेत. साधेपणा, समर्पण आणि अभ्यासू वृत्ती ही त्यांची ओळख होती.त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.
परंडा तालुक्यातील सोनगिरी गावाजवळील पुलावर उल्फा नदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंडा – बार्शी रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी गडावरती शिवाई मातेचा नवरात्र उत्सव सुरू झालाय. देवीचा गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलाय. नवरात्र उत्सव काळात गडावरती विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून गेली शेकडो वर्ष गडावरती शिवाई मातेचा उत्सव साजरा केला जातो.
बीड तालुक्यातील नांदूर हवेली गावाला सिंदफणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. यामध्ये गावातील तब्बल 23 लोक एका घरावर अडकून पडले आहेत. यासाठी सध्या मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. गावाच्या परिसरामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली आहे.
जळगावच्या पाचोरा शहरात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलावरून हिवरा नदीच्या पुराच्या पाण्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने उडी मारल्याची घटना घडली आहे. पुरात उडी मारताना तसेच वाहून जाताना संबंधित व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रकाश हरी पाटील असे 50 वर्षीय पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीवर ते चालक असल्याची माहिती मिळाली आहे.
धाराशिवच्या परांडातील देवगाव इथं चांदणी नदीचे पाणी वस्तीत शिरले आहे. वस्तीतील घरांना कुलुप लावून लोक दुसरीकडे स्थलांतरीत झाले आहेत. पुराच्या पाण्यात पूर्णपणे संसार भिजला असून घरातील साहित्याचं नुकसान झालं आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच पावसामुळे संत्रा, केळी, सोयाबीन ,कपाशी आणि इतर पिकांचे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी प्रहारने आज चांदूरबाजारमध्ये आंदोलन केले. निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपस्थित नसल्याने प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहारने दिला आहे.
पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प ऑक्टोबरमध्ये भेटण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी दोन्ही नेते मलेशियामध्ये भेटू शकतात. आसियान शिखर परिषद 26-28 ऑक्टोबर रोजी मलेशियातील क्वालालंपूर येथे होणार आहे. या शिखर परिषदेदरम्यान एक बैठक होण्याची अपेक्षा आहे.
नागपूर येथील विजयादशमी सोहळ्यात भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे आहेत. मोहन भागवत आणि सुनील आंबेकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
पुण्यात आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर पोलिसांचा हातोडा पडला आहे. पुण्यातील नाना पेठे मधील अतिक्रमण पाडायला सुरूवात केली आहे. पुणे महानगरपालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरु आहे. अनधिकृत फ्लेक्स आणि बांधकाम पाडायला पोलिस आणि पालिकेकडून आज सकाळपासून सुरुवात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती दत्ता म्हणाले, “आरोप असा आहे की तुम्हाला २०० कोटी रुपयांची भेट मिळाली. कायदा असा आहे की कोणीही यात सहभागी होऊ शकतो . दोन अतिशय जवळचे मित्र, जर एका मित्राने दुसऱ्या मित्राला काही दिले आणि नंतर त्यांनी गुन्हा केला तर त्यांना वेगळे करणे खूप कठीण असते.”
पुणे ते वाराणसी या विमानाने प्रवास करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्याच्या बॅग मध्ये रिव्हॉल्वर आढळून आल्याने खळबळ माजली आहे. चंद्रकांत प्रभाकर बागल (वय ६३, रा. गादेगाव, पंढरपूर) यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि काडतुसे आले आढळून
वकील गुणरत्न यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी आरपीआय आठवले गटाने केली आहे. आरपीआय आठवले गटाकडून दहिसर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील नाना पेठे मधील अतिक्रमण पाडायला सुरूवात केली आहे. अनधिकृत फ्लेक्स आणि बांधकाम पाडण्यात आले आहेत.
मुलुंड टोल नाक्याजवळ ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. मोटरसायकल वाचवण्यासाठी पुढच्या चारचाकी वाहनाने अर्जंट ब्रेक मारला. त्यामुळे एकापाठोपाठ सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील वडनेर देवगाव इथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू सुरू आहे. आतापर्यंत २२ लोकांचे रेस्क्यू करण्यात आले असून दहा जणांचे रेस्क्यू बाकी आहे. पुराच्या पाण्यामुळे घराच्या छतावर लोक अडकून पडले होते.
उल्हासनगर कॅम्प चारमधील प्ले ग्रुपमध्ये चिमुकल्याला मारहाण प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने प्ले ग्रुपची तोडफोड केली आहे. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारहाण प्रकरणानंतर शिक्षिका फरार झाली आहे.
आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातलं पाचवं शक्तिपीठ असलेल्या आई एकविरा देवी मंदिरात पहाटेपासून भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पहायला मिळतेय. दुपारी बारा वाजता घटस्थापना झाली. महाराष्ट्रात गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ येथील भाविक दर्शनासाठी येतात.
दादर जिमखाना उद्घाटनानंतर सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे एकत्र बाहेर आले. मात्र माध्यमांशी संवाद संपेपर्यंत राज ठाकरे सचिनची वाट बघत उभे राहिले. अखेर एकाच गाडीतून सचिन-राज ठाकरे रवाना झाले.
जालन्यातील बदनापूर तालुक्यातल्या शेलगाव, मात्रेवाडी, हलदोला या आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळतोय. कपाशी, सोयाबीन, तूर यासह अन्य पिकंही पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
ठाण्यात मेट्रो-4 ची ट्रायल रन यशस्वी झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
आजचा दिवस अतिशय आनंददायी आणि ऐतिहासिक. मेट्रोच्या नेटवर्कमुळे वाहतूक कोंडी कमी होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचेल. पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व काम पूर्ण करु असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आज ठाणे मेट्रोची ट्रायल रन झाली.
विरार पूर्व आर टी ओ कार्यालयाजवळ आज सकाळी 11 वाजता ही घटना घडली आहे. विरार फाट्याकडे ऍक्टिव्हा चालक जाताना, ऍक्टिव्हा खड्ड्यात पडली. चालक खाली पडला असता, पाठीमागून येणाऱ्या टँकरने त्याला चिरडलं. यात ऍक्टिव्हा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून,घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.प्रताप नाईक (वय 55) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून, विरार तांदूळ बाजारकडून विरार फाट्याकडे जाताना ही घटना घडली आहे.
राज साहेबांचे मी ही आशीर्वाद घेतले. मी पदस्पर्श केला. त्यांनी सुद्धा पाठिवर थाप मारली. आमच खूप जुन नातं आहे राजसाहेबांशी. बाळासाहेब ज्यावेळी होते. त्यावेळी राजसाहेबांच भेटायचो. आज मी त्यांचा शेजारी आहे. निवडणुका एक वेगळा विषय आहे असं सदा सरवणकर म्हणाले.
शहरात 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. चतुर्श्रुंगी देवी, भवानी माता,तांबडी जोगेश्वरी तसेच सारसबागेतील महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल केले आहेत. आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक नवरात्र उत्सव काळात आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हा रस्ता बंद करण्यात आला आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक वाहतूक एकेरी सुरू राहील. वाहन चालकांनी गाडगीळ पुतळा मार्गे शिवाजी रस्त्याचा पर्यायी मार्ग वापरावा.
बुलढाणा ते चिखली रस्ता वाहतुकीसाठी बंद . पैनगंगा नदीला आला पूर , येळगाव जवळील पुलावरून पाणी असल्याने वाहतूक बंद झाली आहे. बुलढाणा , लोणार सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
पत्रकारांवरील हल्ला ही निषेधार्ह बाब, पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करतील. त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या हल्ल्याची बाब निदनीय आहे या हल्ल्याच्या निषेध करतो. पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्रंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांच्या हल्याबाबत पोलिस कठोर कारवाई करेल. अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
शिवाजी पार्क जिमखान्याच्या नुतनीकृत वास्तूचं लोकार्पण करण्यात येत आहे. राज ठाकरे, सचिन तेंडुलकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत.
मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात वेळ घालवावा नाहीतर बीड व्हायला वेळ लागणार नाही. ठाणं विकायला काढलं आहे – संजय राऊतांचे टीकास्त्र
काल रात्री 8 वाजता मॅच असल्याने मोदींनी 5 वाजताच घोषणा केली. मोदींनी आमचे 15-15 लाख रुपये दिले असे तर ते अधिक सोईचं झालं असतं – संजय राऊतांची टीका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांची कॅबिनेटनंतर निर्मल भवनला एक गुप्त बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर शिंदेनी नाराजी नोंदवली, मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारे दुर्लक्ष यावरून शिंदेंनी मंत्र्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरी जगताप गावात काल संध्याकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. बेकायदेशीरपणे डीजेच्या मोठ्या आवाजात काढलेल्या बैल पोळ्याच्या मिरवणुकी दरम्यान गोंधळ निर्माण झाला. यावेळी बैल बिथरल्याने अवधूत जगताप नावाचा चार वर्षांचा मुलगा बैलांच्या पायाखाली सापडून गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर, मुलाच्या कुटुंबाने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडे अवैध डीजेच्या मालकावर आणि मिरवणुकीच्या आयोजकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली आहे. आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयंदेव, गारखेडा, सोमठाणा, सोनोशी आणि खापरखेडा यांसारख्या परिसरातील नद्या-नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे तुरुम्हणा येथील जिल्हा परिषद शाळेत आणि नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तसेच, विद्रुपा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतीमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीची मातीही वाहून गेली आहे.
करमाळा तालुक्यात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. करमाळा तालुक्यातील पाथुर्डी आदी गावात शेतात पावसाचे पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातील जेऊर ते लव्हे या पुलावरून पाणी वाहत असल्याने जेऊर ते गावांचा संपर्क तुटला असून हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी सध्या बंद आहे
पुण्यातील नवरात्र उत्सवाचा मानबिंदू असलेल्या चतुःश्रृंगी शारदीय नवरात्र महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या चतुःश्रृंगी मंदिरात भक्ती आणि श्रद्धेचे विलोभनीय रूप पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्यमय वातावरण आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे दर्शन घेण्यासाठी पुणे आणि आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत, ज्यामुळे उत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री पुन्हा एकदा झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड तालुक्यातील मोरगाव येथील अहिल्यानगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जाधव वस्तीमध्ये पाणी शिरले. घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बार्शी तालुक्यातील चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ. चांदणी नदीला पूर आल्याने या गावाकडे जाणारे पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे आगळगाव, मांडेगाव, खडकलगाव, धस पिंपळगाव, देवगाव, कांदलगाव या गावांचा संपर्क तुटला. या पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबिन आदी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे
धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यात ढगफुटी सदस्य पाऊस झाला आहे या पावसाने या परिसरातील छोटे मोठे तलाव देखील फुटलेले पाहायला मिळत आहे. परंडा तालुक्यातील लाखी, भूम तालुक्यातील अंतरगाव, चिंचपूर ढगे, हिवरडा, वालवड परिसरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.
अकलूज ते सांगोला मार्गावरील घुमेरा ओढयावरील पुलावरून वाहत आहे पाणी. घुमेरा ओढ्या वरील पुलावर पाणी आल्याने सांगोला अकलूज रोड झाला बंद. सुमारे 12 तासापासून या मार्गावरील वहातूक ठप्प
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आणि गुन्हेगारी टोळ्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या परिमंडळ १ कडून एकूण ४३ जणांना तुरुंगात पाठविण्यात आल्याची माहिती. या सर्व ४३ जणांवर एकाच दिवसात कारवाईचा बडगा उचलण्यात आला. यापैकी अनेक जण हे शहरातील टोळीतील सदस्य आहेत.
पावसाचा जोर अधिकच असल्याने गावातही घुसले मोठ्या प्रमाणात पाणी;जलमय स्वरूप् प्राप्त. राजाकौंडी नदीला आला मोठा पूर, नागरिकांच्या घरातही पाणी. शेतीपिकानही बसला मोठा फटका, पाणी सचल्याने शेतांना तालावाचे स्वरूप प्राप्त
आज नवरात्रोत्सवाची पहिली माळ असल्याने राज्यभरातील भाविक दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार सप्तशृंगी गडावर यात्रा उत्सव. भाविकांची दर्शनासाठी गडावर मध्य रात्रीपासून गर्दी. गडावर देवीचा अभिषेक सुरू असून थोड्याच वेळात आभूषण घातली जाणार