
पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून आरोग्य विभागाकडून पाणी, चिकनच्या नमुन्यांच्या तपासणीवर भर देण्यात येत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 170 वर पोहोचली आहे. जीबीएसच्या 61 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कल्याण कोळसेवाडी बालिका अत्याचार हत्याकांड प्रकरणी पोलीस आठवडाभरात न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल करमार असून जलदगती न्यायालयात खटला चालवणार आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तलयांच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदे येणार आहेत. तसेच तळेगांव दाभाडे,चाकण MIDC मध्ये देखील नव्या उद्योग समूहाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासह देश-विदेशातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचण्यास मिळतील. लेटेस्ट अपडेटसाठी वाचत रहा हा ब्लॉग.
सांगलीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना ठाकरे गट नेते पैलवान चंद्रहार पाटील याची पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार असून आहे. यंदाची 2025 महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहमदनगरमध्ये मोठ्या उत्साहात चालू असताना शेवटच्या दिवशी या स्पर्धेला गालबोट लागले. गादी विभागातील अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर पैलवान शिवराज राक्षेने गोंधळ घातला होता. पंचाचा निर्णय अमान्य करत शिवराज राक्षेने आखाड्यातच पंचाची कॉलर पकडत त्यांना लाथ मारली. या प्रकरणानंतर कुस्ती परिषदेकडून शिवराज राक्षेवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. याचे राज्यभरात पडसाद उमटलेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गोंधळावरून महाराष्ट्राचा डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील राड्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आता आपल्याला मिळालेल्या दोन्ही चांदीच्या गदा परत देण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित या प्रकरणारावर महत्त्वाची माहिती या पत्रकार परिषदेत देण्याची शक्यता आहे.
करुणा शर्मा यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले. यावेळी करुणा शर्मा यांनी मी धनंजय मुंडेंच्या संपूर्ण संपत्तीवर दावा करणार असल्याचे म्हटलं आहे. या प्रकरणाबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी धनंजय मुंडे यांची बाजू मांडली असून त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. ते गुणरत्न म्हणाले आहेत की ” केस लढण्याबाबत मी काही बोलणार नाही. हा निकाल अंतरिम आहे. या निकालात ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर आहे. त्यात कुठेही हिंसा केलीय असं म्हटलं नाही. बायको किंवा नवरा आहे, असंही नमूद केलं नाही. या निकालात मेंटेनन्स पोटगी दिलेली आहे. त्यामुळे निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी एकच अर्थ आहे. हे पहिलं न्यायालय आहे. त्यावर रिव्हिजन आहे. अपील आहे. रिट आहे. नंतर सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे एखाद्या निकालावर खोलात पाय गेला, अडचणी वाढल्या, राजीनामा दिला पाहिजे, हे निकालाचं राजकारणी करण करत आहोत. त्यामुळे या निकालाचे अनेक अर्थ काढू नये”
वसईत प्लास्टीक खेळने बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली असून कामन परिसरात ही प्लॅस्टीक खेळणे बनविणारी कंपनी असून, दुपारी 3 वाजता ही आग लागली आहे.
पुण्यातील चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील निबे लिमिटेड मिसाईल्स कॉम्प्लेक्स अँड प्रिसिजन मशीनिंगच्या अत्याधुनिक मिसाईल्स अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.
विवाहितेला साखळदंडाने बांधून ठेवल्या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आई,वडील,भाऊ,बहिण अशा 4 जणांवर पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला खेळांमध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे. त्यांनी अलिकडेच एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे की ट्रान्सजेंडर लोक आता महिलांच्या खेळांमध्ये भाग घेऊ शकत नाहीत.
चिराग पासवान म्हणाले, मी दिल्लीत अनेक ठिकाणी गेलो, राजधानीत भाजप-एनडीएचे डबल इंजिन सरकार स्थापन होणार आहे.
अमेरिकेने भारतातील 104 बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढले आहे. यावर भारतात गदारोळ माजला आहे. यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना परत पाठवले जाते.
मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असल्याचा दावा पुन्हा एकदा करुणा मुंडे हीने केला आहे. बीडच्या जेलमध्ये मला 16 दिवस ठेवलं. येरवड्यातील जेलमध्ये मला 45 दिवस ठेवलं. मला खोट्या केसमध्ये दोनदा जेलमध्ये टाकलं असं करुणा मुंडे यांनी सांगितलं.
नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या 8 बांगलादेशी तरुणांना नाशिक शहरातील विविध भागातून ताब्यात घेतलंय. मध्यवर्ती गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
अमेरिकेतून भारतात आणलेल्या भारतीयांना मिळालेल्या वागणुकीचे संसदेत पडसाद. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाचं निषेध आंदोलन. सभागृहात देखील विरोधी पक्ष आक्रमक.
जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशनची 1 हजार 478 पैकी केवळ 296 योजनांची कामे पूर्ण. 31 मार्च 2024 पर्यंत या योजनांची कामे पूर्ण करण्याची मुदत होती. जिल्ह्यात 1 हजाराहून अधिक पाणीपुरवठा योजनांची कामे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील कामांची गती पाहता, अजून या वर्षात तरी अनेक गावांमध्ये 24 तास पाणीपुरवठा होणे कठीण दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात जनता दरबार सुरू आहे. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि इंद्रनील नाईक यांचा जनता दरबार सुरू आहे. कार्यालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळतेय. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याचेही अधिकाऱ्यांना सूचना आहेत.
नवी दिल्ली- लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला. अमेरिकन नागरिकत्व नाकारलेल्या प्रवाशांचे विमान भारतात दाखल झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच लोकसभेचे कामकाज सुरू आहे. अर्थसंकल्पावर आज विविध पक्ष सभागृहात आपली मत मांडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून खासदार सुप्रिया सुळे अर्थसंकल्पाबाबत मत मांडणार आहे.
नाशिक- कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना दणका देण्यात आला आहे. 15 फार्मर प्रोडूसर कंपन्या ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून NCCF कडून पंधरा कंपन्यांचे सगळे व्यवहार स्थगित करण्यात आले आहेत. नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीत घोटाळ्याबाबत कारवाई करण्यात आली.
जालन्याच्या नाफेड केंद्रावर अर्धा ते पाऊण किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी नाफेड केंद्रावर दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन बाकी असल्याने मुदत वाढ देण्याची सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकारने किमान एक महिन्याची मुदत वाढवून द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
नाशिक- महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा पुष्पोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी हा पुष्पोत्सव रद्द केला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निधीची बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक वर्षी राजीव गांधी भवनच्या प्रांगणात पुष्पोत्सव होतो. यंदा देखील सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान हा पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी 47 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने निधीची बचत व्हावी या उद्देशाने कार्यक्रम रद्द करण्यात आला. पुष्पोत्सव रद्द झाल्याने महापालिकेच्या प्रांगणातील मंडप काढण्याचे काम सुरू आहे.
अमरावती- नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबीन खरेदीविना नाफेडमध्ये आहे. सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. अमरावतीमधील नाफेड केंद्रावर सोयाबीनच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
नाफेडमध्ये सोयाबीनला 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळतोय. तर खाजगी बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर 3 हजार 500 ते 4 हजारपर्यंत गेले आहेत. सोयाबीन खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे.
कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लक्ष्मी मार्केटमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलासाठी मक्याची सालं घेण्यासाठी आलेल्या 50 वर्षीय शेतकऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. बारक्या मढवी असं या शेतकऱ्याचं नाव असून सकाळी सहा वाजताच्या सुमारास बैलांना चारा घेण्यासाठी ते मार्केट परिसरात आले होते. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. शेतकऱ्यावर हल्ला करून हल्लेखोर पसार झाला असून महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जळगाव शहरातील विविध भागात घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्या पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 10 तोळे सोनं, 650 ग्रॅम चांदीसह एलईडी टीव्ही असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपीकडून आठ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.
कल्याण शिळफाटा रोडवर मध्य रात्री 12 वाजे पासून पुढील पाच दिवस जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कल्याण शीळरोड वरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज रात्री 12 वाजेपासून ते 10 फेब्रुवारीच्या काळात कल्याण शीळ रोड वर जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आला आहे.
लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला आता अपात्र ठरल्या जात आहे यावर बच्चू कडू म्हणाले की यामध्ये निवडणूक आयोगाने पारदर्शक विचार करून चौकशी केली पाहिजे. डायरेक्ट नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेट मधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मत ओढण्याचा प्रयत्न झाला आहे,ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती,सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले. सरकारने मतं घेतले मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे, त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
सरकारला बहुमताचं डिप्रेशन आलं आहे. यातून ते बाहेरच पडत नाहीत, असा टोला संजय राऊतांनी महायुतीला लगावला.
मीरा भाईंदर महापालिकेने स्वतंत्र टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. महापालिका मुख्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली जाणार आहे. यासंबंधीचे एक धोरण महापालिकेकडून निश्चित करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी 40 वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष अखेर संपलाय. आष्टी उपसा सिंचन योजनेचा टप्पा 2 मधून खवणी, पोखरापूर आणि सारोळे गावाला पाणी पोहोचलेय
अभिनेता राहूल सोलापूरकर यांच्या पुण्यातील घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस पिंजरा व्हॕनसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यंदा फळांचा राजा हापूस आंब्याची सर्वसामान्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. बदलत्या हवामानाचा फटका यंदाही हापूसला बसत आहे. बदलत्या हवामानामुळे एका बाजूला मोहर तर एका बाजूला पालवी असे संमिश्र चित्र आहे. त्यामुळे हापूस आंब्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रत्नागिरी – यंदा फळांचा राजा हापूस आंब्यासाठी सर्वसामान्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. बदलत्या हवामानाचा फटका यंदाही हापूसला बसला आहे. बदलत्या हवामानामुळे एका बाजूला मोहर तर एका बाजूला पालवी असे संमिश्र चित्र दिसत आहे, त्यामुळे हापूस आंब्याची आणखी वाट पहावी लागणार आहे.
काही झाडांवर लागलेली कैरी एप्रिल महिन्यात तयार होणार, त्यामुळे 15 एप्रिल नंतरच बाजारात हापूस आंबा दाखल होण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादामुळे डीपीडीसी बैठक देखील रखडली आहे. जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने डीपीडीसी बैठक होण्यासाठी अडथळे येत आहेत. DPDC बैठक होत नसल्याने निधीचे नियोजन देखील होत रखडल्याने विकास कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण केल्याप्रकरणी सोलापुरात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता वीर पहारीयावर केलेल्या विनोदामुळे कॉमेडीयन प्रणित मोरेला 2 फेब्रुवारी रोजी मारहाण झाली होती. या संदर्भात पोलीस दखल घेत नसल्याची खंत प्रवीण मोरेने सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त केली होती. त्यानंतर लक्ष्मण मोहन झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या 12 जणांवर सदर बझार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जीबीएसच्या रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतच्या पाण्याची नमुने तपासण्यासाठी पाठवले जाणार आहेत.
जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. अचानक रुग्ण वाढल्यास यासाठी आयसीयू तयार करण्यात आलं आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात एक रुग्ण असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
रत्नागिरी – तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस आता दादर रेल्वे स्थानकापर्यत धावणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या फलाट क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 28 फेब्रुवारी पर्यत या दोन्ही रेल्वे दादर रेल्वे स्थानकापर्यतच धावतील. तर मंगळूर सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस सुद्धा ठाणे रेल्वे स्थानकापर्यतच धावणार.
पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून आरोग्य विभागाकडून पाणी, चिकनच्या नमुन्यांच्या तपासणीवर भर देण्यात येत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 170 वर पोहोचली आहे. जीबीएसच्या 61 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.