
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला आज दोन महिने उलटले आहेत. याप्रकरणावरुन सध्या राजकारण तापलं आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. शिवसेना ठाकरे गटातील अनेक माजी आमदार, कार्यकर्ते हे सध्या शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मनसे नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत आगामी पालिका निवडणुकीबद्दल चर्चा केली जाणार आहे. यासह देश-विदेशातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचण्यास मिळतील. लेटेस्ट अपडेटसाठी वाचत रहा हा ब्लॉग.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आजच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर त्यांनी भाजप खासदार संबित पात्रा यांच्यासह मणिपूरच्या राज्यपालांचीही भेट घेतली.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेणं आवश्यक वाटला नसेल असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
दिल्ली निवडणुकीच्या निकालांवर, तेलंगणातील हैदराबादमधील भाजप खासदार डॉ. के. लक्ष्मण म्हणाले की, “हा एक ऐतिहासिक विजय होता, लोक उत्साहित आहेत आणि भाजप तेलंगणातही भ्रष्ट काँग्रेस सरकारला उलथवून टाकेल. तेलंगणामध्ये लवकरच कमळ फुलेल.”
कोंढवा येथील एनआयबीएम रोडवरील एका निवासी इमारतीला आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. आग विझवण्यात आली आहे पण या आगीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात पवित्र स्नान केले. शिवकुमार म्हणाले की त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. ते त्यांच्या कुटुंबासह महाकुंभ मेळ्याला आले आहेत.
कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, असा इशारा किसानसभेचे डॉ.अजित नवले यांनी दिला. सोयाबीन खरेदी बंद केल्याने अनेक शेतकरी वंचित झाले आहे. लाखो शेतकर्यांचे सोयाबीन पडून आहेत. खरेदी केंद्राबाहेर अजूनही शेतकर्यांच्या रांगा आहेत.
देशात गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नाने नक्षलवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोलीत देखील आम्ही तेच पुढे राबवत आहोत. देशाच्या इतर भागातही अशाच प्रकारे नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न चालला आहे. या पुढच्या काळातही असेच प्रयत्न जारी राहतील, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आर्थिक अडचणींमुळे संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांनी 32 लाखांची आर्थिक मदत दिली. शिवसेना नेते विजय शिवतांरे यांच्याकडे ही रक्कम सोपवण्यात आली आहे.
राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. तर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा एक दावा समोर आल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या. शिंदे यांना फोन करून मराठीतून वाढ दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
6 फेब्रुवारी रोजी सोयाबीन खरेदीची मुदत संपली, शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्रावरून न हटण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी पुणे रिव्हर रिव्हायवलतर्फे पुण्यात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रा काढत पुणेकर चिपको आंदोलन करणार. पदयात्रेत अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनम वांगचूक हो सहभागी झाले आहेत.
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी उपस्थिती लावली. तीन सत्रात झालेल्या या संमेलनात मुलाखात, कथाकथन, व कवी संमेलन पार पडले.
ठाण्यात आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात याठिकाणी लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सुसाट वाऱ्यामुळे धाराशिवच्या चिलवडी येथे द्राक्षाची बाग कोसळून शेतकऱ्याचे चाळीस लाखाचे नुकसान झाले. धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथील शेतकरी शाहू संदीप जाधव त्यांची दीड एकर बाग जमीन दोस्त झाली.
राहुल गांधी हे नशेत असल्यासारखं बोलतात. राहुल गांधी हे शुद्धीत आहेत की नाही हा आम्हाला प्रश्न पडला आहे. दिल्लीच्या निकालानंतर गांधी यांनी तीन वेगवेगळी स्टेटमेंट दिली. ज्यांना हिमाचल ची लोकसंख्या किती ते माहीत नाही ते महाराष्ट्र च्या निकालावर बोलतात त्याच्या बोलण्यात काही अर्थ नाही, असा टोला राहुल गांधी यांना नितेश राणे यांनी लागावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत सुरेश धस यांच्या शिष्टाईमुळे जरी लॉंगमार्च थांबला असला तरी आम्ही आंबेडकरवादी संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार आहोत असे आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्या विजया विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. केवळ राजकीय आकसानेही याचिका चौगुले यांनी याचिका दाखल केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केला आहे.
छत्तीसगडमध्ये चकमकीत 31 माओवादी ठार झाले असून छत्तीसगड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नाने नक्षलवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
चारकोपमध्ये माघी गणेश ऊत्सवादरम्यान गणेश विसर्जनाच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रॉलीला कूलप लावून विसर्जनाला परवानगी नाकारली. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असल्यानं विसर्जनास मनाई करण्यात आली. जेव्हा गणपती मंडळाने याबद्दल विचारल असता “मूर्ती परत मंडळात घेऊन जा आणि तिथे विसर्जन करा. आम्ही इथे विसर्जन होऊ देणार नाही” असं म्हणत प्रदूषणमुळे गणपती विसर्जनास विरोध करण्यात आल्याची माहिती आहे.
भाईंदर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भारतीय दंड संहिताचे कलम 153 अ आणि 505(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू टास्क फोर्सचे संस्थापक ॲड. खुश खंडेलवाल यांच्या तक्रारीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांनी वैभव राऊत हा तरूण मराठा मोर्चात बॉम्ब फोडणार होता, असा दावा केला होता. दोन समाजात शत्रुत्व निर्माण केल्याप्रकरणी खंडेलवाल यांनी तक्रार केली होती. मात्र खंडेलवाल यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यानंतर खंडेलवाल यांनी न्यायदंडाधिकारी, ठाणे येथे फौजदारी याचिका दाखल केली.
“शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मोठमोठे पक्षप्रवेश होणार असून , हे पक्षप्रवेश 11 तारखेनंतर सुरू होतील. यामुळे मोठा धक्का ठाकरे गटाला बसणार आहे त्यांनी तयारीत राहावं”, असा इशाराच शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी दिला आहे. हळूहळू करून उद्धव ठाकरे यांना सगळे सोडून जातील आणि ते शेवटी एकटेच राहतील. असही कायंदे यांनी म्हटलं आहे.
पुणे- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’मध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांनी मिळालेले लाभाचे पैसे परत देण्यास सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातील महिला पैसे परत करण्यात आघाडीवरआहेत. त्याखालोखाल कोल्हापूर अहिल्यानगर या जिल्ह्यांचा क्रमांक आहे. पुण्यातून 75 हजार महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली. महिलांनी परत केलेले पैसे शासनाच्या तिजोरीत जमा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आलंय. या महिलांनी सरकारी बँकेत जाऊन या लेखाशीर्षच्या खात्यामध्ये एका चलनाद्वारे पैसे परत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पिंपरी चिंचवड- बाहेरून पिझ्झा मागवल्याने समाजकल्याण वसतिगृह, विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. पिंपरी शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतीगृह आहे. याच ठिकाणी असलेल्या काही विद्यार्थिनींनी दोन दिवसांपूर्वी खाण्यासाठी पिझ्झा मागवला होता. ही बाब वसतिगृहाच्या गृहप्रमुख मिनाक्षी नारहारे यांना कळली आणि त्यांनी एक अजब फतवा जारी केला.
एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनींपैकी नेमका पिझ्झा कुणी मागवला हे स्पष्ट होत नसल्याचे कारण देत चौघींनाही एका महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी घातली. हॉस्टेल वर राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेरील व्यक्ती किंवा खाद्यपदार्थ आणण्यास नियमानुसर बंदी आहे. मात्र हा नियम मुलींनी पिझ्झा मागवला आणि त्यामुळे कारवाई केली जात असल्याचं विद्यार्थिनी आणि पालकांना एका लेखी पत्राद्वारे कळविण्यात आलंय. मात्र अशा चुकांसाठी विद्यार्थिनी प्रवेश बंदी करण्याचे आदेश समजिक न्याय विभागाने परित केले आहेत का याचा खुलासा होत नसल्याने पालकांमध्ये संताप आहे.
छत्तीसगड चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात एसटीएफ आणि एटीसी पोलीस जवानांना यश मिळालंय. पण चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टरने जखमी जवानांना उपचारासाठी जगदलपूरला नेण्यात आलंय. महाराष्ट्रात छत्तीसगड सीमावर्ती भागात आज सकाळपासून चकमक सुरू झाली. बिजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात ही चकमक झाली असून अजूनही चकमक सुरू आहे.
छत्तीसगडमधील चकमकीच्या ठिकाणी सीआरपीएफ पोलिसांचे दोन तुकडी रवाना झाले आहेत. मोठ्या संख्येत माओवादी असल्याने चकमक सुरू असलेल्या जवानांच्या वायरलेसवर सीआरपीएफ पोलीस जवानांची मदत मागण्याचे मेसेज आले. जवानांचं बल वाढवण्यासाठी पोलीस अधीक्षक बिजापूर आणि सीआरपीएफ कमांडर यांच्यात संयुक्त चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृह विभागसुद्धा या ऑपरेशनची माहिती घेत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील साने चौक सिध्दी पार्क ते मनपा शाळा दरम्यान अज्ञात टोळक्याने 10 वाहनांची तोडफोड केली. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या या वाहनांवर लोखंडी रॉड, कोयता मारून वाहनांच्या काच्या फोडल्या असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर या वाहनांचे नुकसान झाले असून परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घटला असावा असं नागरीक म्हणतायत. दरम्यान या प्रकरणी वाहन चालकांनी आणि मालकांनी चिखली पोलिसांत फिर्याद दिली असून चिखली पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
“काही आरोपींचे मोबाईल 14 तारखेपर्यंत चालू होते. त्या सर्वांचे सिडिआर काढले तर सर्व सत्य समोर येईल. यातील काही आरोपी मुक्त संचार करत होते. ते आरोपी स्वतः आले म्हणजे ते इथंच होते. त्यांना इथंच लपवलं होतं. हत्येप्रकरणाती सर्व आरोपींचे मोबाईल त्यादिवशी साडे दहा वाजेपर्यंत चालू होते. तो तपास फास्ट झाला असता, पण झाला नाही,” असं धनंजय देशमुख म्हणाले.
राजन साळवींचा 13 तारखेला पक्षप्रवेश होणार… अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 10 तारखे ऐवजी 13 तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात फोन… राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याची देखील सूत्रांनी दिली माहिती…
केंद्रीय आणि राज्य गृहखात्याचा संयुक्त निर्णय… रामजन्मभूमी आंदोलन आणि फुटिरतावाद्यांच्या विरोधातील भूमिकेच्या अनुषंगाने अजित गोपछडेंना सुरक्षा देण्याचा निर्णय… खासदार गोपछडे देशभरात कुठेही प्रवास करताना त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक असणार
इंडिया आघाडी टिकणार नाही हे सर्वांना माहित होतं. मविआच्या पक्षांना आता स्वतंत्र अस्तित्व टिकवायचंय. मविआचं पुढच्या 25 वर्षांचं भविष्य हे अंधारात असेल, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.
दिल्लीत अनेक वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झालं. आपला सत्तेतून पायऊतार व्हावं लागलं.तर भाजपने दिल्लीत कमळ फुलवलं. आप सत्ता कायम राखण्यात अपयशी ठरली. दिल्ली निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आप-काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता. निकालावर सर्वांनी विचार केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच आता निवडणुका लोकशाही पद्धतीने लढल्या जात नाहीत. महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत दिसला, बिहारमध्येही दिसेल, असंही संजय राऊत म्हणाले.
भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय आणि राज्य गृहखात्याने याबाबत संयुक्त निर्णय घेतला आहे. रामजन्मभूमी आंदोलन आणि फुटिरतावाद्यांच्या विरोधातील भूमिकेच्या अनुषंगाने अजित गोपछडेंना सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार खासदार गोपछडे देशभरात कुठेही प्रवास करताना त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक असणार आहे.
कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो असलेल्या बॅनरवर “हुकूमी जोडी’चा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. हा केवळ शुभेच्छा संदेश की राजकीय संकेत? असे विविध तर्क-वितर्क सुरु झाले आहेत
जालना : शेतकऱ्यांची भर दिवसा रस्त्यात अडवणूक करून त्यांना मारहाण करून पैसे लुटणारी चार जणांची टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली. शिवाय त्यांच्याकडून 9 लाख 30 हजारांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला. जालना तालुक्यातील एक शेतकरी आपल्या घरातील कापूस जिनिंग व विक्री करून मिळालेले पैसे घेऊन घराकडे निघाला होता. मात्र याच टोळीने या शेतकऱ्याला रस्त्यात अडवलं आणि पैसे हिसकावून पसार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत ताब्यात घेतलं.
परभणी : सोमनाथ सुर्यवंशी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणात चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. नवा मोढा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तुरनर, पोलीस अंमलदार सतीश दैठणकर, मोहित पठाण, राजेश जटाळ यांना आता निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना यापूर्वी निलंबित केले होते.
बच्चू कडूंना सहकार विभागाचा दणका, आमदारकीनंतर ‘हे’ पद धोक्यातhttps://t.co/nGLgfdOxB3 #Bacchukadu
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2025
पुणे – पुणेकरांनो पाणी जपून वापरा, अशा कडक सूचना जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिल्या आहेत. शहरातील पाणी वापर वाढला असल्याचे जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने नमूद केले आहे. महापालिकेस मंजूर असलेल्या पाणी वापराच्या कोट्यापेक्षा खडकवासला धरणांतून शहरासाठी अधिक पाणी घेतले जाते. परिणामी, जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी कमी पडत असून पालिकेने शहरातील पाणी वापर कमी करावा अशा, सूचना जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने एका सुनावनीत पालिकेस दिल्या आहेत
पुणे – महात्मा फुलेवाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रिकरण व विस्तारीकणासाठी आरक्षित असलेल्या जागेची भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याच्या प्रस्तावास महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामासाठी परिसरातील ९१ इमारतींची जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. या इमारतींमध्ये ८०१ कुटुंब राहात असून, त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी ५ हजार ३१० चौरस मीटर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. शासनाने नुकतेच या भूसंपादनासाठी २०० कोटींच्या खर्चास मान्यता दिली असून पालिकेकडूनही ४० कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
पुणे : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालया मार्फत राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन एल्डरलाइन- १४५६७ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यावर मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधता येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूतीपूर्वक सेवा करून सुखी आणि निरोगी जीवन वृद्धींगत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही हेल्पलाइन महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय आणि जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येत आहे.