
राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्राणहिता नदीला अजूनही मोठा पूर आला आहे. सुदैवाने वैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी ओसरत असल्यामुळे काही मार्ग खुले झाले आहेत. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्ग येत्या दोन तासांत सुरू होण्याची शक्यता आहे, तर चामोर्शी-आष्टी राष्ट्रीय महामार्ग सायंकाळपर्यंत वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. सध्या पावसाने गडचिरोलीत पूर्णपणे विश्रांती घेतली असली तरी, वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी नद्या शंभर टक्के भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैनगंगेचा पूर ओसरत असला तरी प्राणहिता नदीतील पाण्याची पातळी मात्र वाढते आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणातही बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. तर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षांकडून चाचपणी केली जात आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये मोठा ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणण्यात रायगड पोलिसांना यश आलं आहे. मुरुड पोलीस यांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 13 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे 2 किलो 776 ग्रॅम वजनाचे 13 लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार उत्तर प्रदेशातील असून विशाल जैस्वाल अस त्याच नाव आहे पोलिसांनी त्याच्यासह रायगड, ठाणे आणि मुंबईतील 13 आरोपींच्या मुसक्या आवळला आहेत.
रायगड जिल्ह्यात मच्छीमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जवळपास 287 बोटी अनधिकृत आहेत. या बोटींचे मालक अद्याप सापडलेले नाहीत. या मालकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. मालक सापडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
मुंबई पुणे रेल्वे मार्गांवर खंडाळ्याजवळ मालगाडीच्या बोगीची चाके निखळून पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक घाटात थांबविण्यात आली आहे. मुंबईहुन पुण्याकडे जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या कर्जत व पळसधरी मार्गांवर थांबविण्यात आल्या आहेत.
बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा आज यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज तालुक्यातील तिवरा,धानोरा,चिरकुटा,तूपटाकळी गावातून प्रवास झाला. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या पापळ गावातून काल ही यात्रा निघाली आहे. आतापर्यंत या यात्रेने 95 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गा विरोधी आंदोलन कायम आहे.तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथे चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी आक्रमक शेतकऱ्यांनी रोखून धरली आहे. मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकरयांनी घेतली आहे.त्यामुळे चार दिवसांपासून प्रशासन मोजणी करू शकलेलं नाही,चौथ्या दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक पद्धतीने मोजणीला विरोध केलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या प्रशासनाच्या गाड्या बाहेर काढण्यावरून पोलीस आणि शेतकऱ्यांच्या मध्ये यावेळी वादावादीचा प्रकार देखील घडला आहे.आक्रमक शेतकरयांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकरी व शेतकरी संघटनांकडून घेण्यात येत आहे,त्यामुळे मोजणी कशी करायची ,असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडीओवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तो त्यांच्या घरचा व्हिडीओ आहे. मी यावर काहीही बोलणार नाही. ज्यांनी व्हिडीओ पुढे आणला त्यांनी कारवाई करावी, असे पटोले म्हणाले.
ब्रेक –
दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु
मंत्री मंगल प्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु
चर्नीरोड येथील महापालिका कार्यालयात बैठक सुरु
मुंबई महापालिकेचे प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित
गणेशोत्सव मंडळांच्या अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा
मंकी हिल स्टेशनजवळ एक मालगाडी रुळावरून घसरली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे.
गुजरातमधील वडोदरा येथे झालेल्या पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 19 झाली आहे. दोन जण अजूनही बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध सुरू आहे.
मुलुंड येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीने आंदोलन केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच आंदोलन केलं. प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलन आणि जल तरण झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली.
धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधील वाटा राष्ट्रवादीला मिळत नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातूनच पक्षांमध्ये गटबाजी निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे यांनी राजीनामा दिला आहे. महेंद्र दुर्गुडे यांच्याबरोबर पक्षातील 72 कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे पक्षश्रेष्ठीकडे खदखद व्यक्त केलीय. हा वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे 21 तारखेला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
आमदार संजय गायकवाड यांच्यावर मरीन डाईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे.
जळगावच्या रॉयल पॅलेस या आलिशान हॉटेलमध्ये एका खोलीत सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून आठ जणांना अटक करीत त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे
सोलापुरात प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रतिमेला हार घातला आहे. जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री सुरू असूनही अन्न औषध प्रशासन अधिकारी त्यावर कारवाई करत नाहीत. वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने झाल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन नरहरी झिरवाळ यांच्या फोटोला हार घातला आहे.
अहिल्यानगरमध्ये वृक्षारोपण करून खासदार निलेश लंके यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरु आहे. नगर-मनमाड महामार्गचे रखडलेले काम सुरू व्हावे यासाठी बेमुदत उपोषण त्यांनी सुरु केले आहे.
कॅनडामधील रेस्टॉरंटमध्ये गोळीबार झाल्यानंतर अभिनेता कपिल शर्माच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबर खालसा इंटरनॅशनल ग्रुपशी संबंधित हरजीत सिंगने कॅनडामधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कपिल शर्माकडे वैयक्तिक सुरक्षा रक्षक असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी त्याच्या घरी आणि फिल्म सिटीच्या सेटवर सुरक्षा वाढवली आहे.
कॅनडामधील रेस्टॉरंटमध्ये गोळीबार झाल्यानंतर अभिनेता कपिल शर्माच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबर खालसा इंटरनॅशनल ग्रुपशी संबंधित हरजीत सिंगने कॅनडामधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
कपिल शर्माकडे वैयक्तिक सुरक्षा रक्षक असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी त्याच्या घरी आणि फिल्म सिटीच्या सेटवर सुरक्षा वाढवली आहे.
मी कारवाईला घाबरत नाही, मी कायदा हातात घेतला आहे, जे होईल त्याला मी सामोरं जाईन – संजय गायकवाड
त्यांनी ( संजय राऊत) एखादी भूमिका मांडली, की त्यावर संशय व्यक्त होतो, टीका केली जाते. त्यांच्या वक्तव्याबद्दल खुूप मोठे आरोप केले जातात, पण राऊतांची अनेक वक्तव्य आहे, ज्यावर त्यावेळी टीका झाली , त्यांनी दिलेली माहिती ही कालांतराने खरीच ठरलेली आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.
संजय राऊतांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. ते 100 दिवसांसाठी आर्थर रोड तुरुंगात होते, ते नरकातून बाहेर आले ना, पुस्तकही लिहीलं त्यांनी ‘नरकातला स्वर्ग’ असं. तिथून बाहेर आल्यावर त्यांच्यावर झालेला हा परिणाम आहे – शिवसेना नेते किरण पावसकर यांची घणाघाती टीका
एकनाथ शिंदे हे काल दिल्लीवारीवर असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते आमची अडचण करत आहेत, ते आम्हाला काम करू देत नाहीत असा ते म्हणाल्याचा चिमटा राऊतांनी काढला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. काल गुरूपौर्णिमेनिमित्त त्यांनी अमित शाह यांचे पाद्यपूजन केले. त्यांच्या पायावर डोके ठेवल्याचा टोला त्यांनी लगावला.
बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाण्यात असलेल्या रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहे. अनेक ठिकाणी तर रस्ते सुद्धा झाले नाहीत .. यामुळे शहरातील नागरिकांना तसेच वाहन धारकांना चालताना मोठा त्रास सहन करावा लागतोय .. आमदार गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ट जेवणावरून राडा केल्यानंतर राज्यभर याची चर्चा होते. मात्र आपल्या मतदार संघातील चित्र सुद्धा पहा विकास कामे झाली किंवा नाही. आपण दोन वेळा आमदार झाला आहे, त्यामुळे जरा इकडे ही लक्ष द्या, अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचं मानधन न मिळाल्यामुळे आणि मानधनामध्ये तफावत असल्याने शिवाय इतर विविध मागण्यांसाठी जनसेवा शासकीय रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालक संघटनेच्या सर्व चालकांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज पासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय.
गडचिरोली वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग चार दिवसापासून पुरामुळे बंद असलेला राष्ट्रीय महामार्ग सुरू झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नागपूर बाजारपेठेतून प्रत्येक मालवाहतूक वाहने व पेट्रोल डिझेलचे टॅंकर, एसटी महामंडळ बसेस चार दिवसापासून पुरामुळे आरमोरी जवळ अडकले होते. सध्या चार दिवसानंतर आज साडेनऊ वाजता हा मार्ग सुरू झाल्यामुळे गडचिरोली वासियांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पालिका निवडणुका 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. 1 जुलै पर्यंतची मतदार यादी वापरावी असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मिरा रोड येथे राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मुस्लिमांवर टीका केली. जे मुसलमान बांधव त्यांच्या सभेत आले बघा आम्ही मराठी बोलतो. उद्याचा अजान मराठीत सुरू करा. मराठी वर एवढेच प्रेम आहे तर सगळ्या मदरशातील उर्दू बंद करून तिथे मराठी सक्ती करा. मग आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात. नुसतं अशा पद्धतीची थूकपट्टी ढोंगीपणा करायचा हे सर्वांना कळत आहे, अशी टीका त्यांनी केली.
कल्याण डोंबिवली ठाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या सर्व स्थानकावर तिकीट मशीनवर AC तिकीटचे पर्याय असूनही क्लिक होत नसल्याने प्रवासी संतप्त.. एसी लोकलसाठी ‘फर्स्ट क्लास → ACMU’ हा पर्याय निवडण्याचे रेल्वे प्रशासनाचे आव्हान… पण अनेक प्रवाशांना माहिती नसल्याने प्रवासी संतप्त…
दहा धरणांमधून 1 हजार क्यूसेकच्या आतमध्ये विसर्ग सुरू, तर दारणा 1100 क्यूसेक आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून 6310 क्यूसेकने विसर्ग सुरू.. विसर्ग घटविल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी घट… पावसाने उघडीप घेतल्यानं शेती कामांना आलाय वेग
दूध भेसळ होत असल्याचा गोपीचंद पडळकरांचा आरोप… दूध भेसळ होत असल्याचा आरोप करत माध्यमांसमोर डेमो दिलं… भेसळ थांबली पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे… असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून कल्याण-डोंबिवली परिसरात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, केवळ दहा मिनिटांच्या मुसळधार पावसानेच शहरातील नियोजनाचा फज्जा उडवला आहे. कल्याणच्या विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात दोन्ही बाजूचे छोटे नाले अद्यापही साफ न झाल्यामुळे गटाराचे पाणी थेट रस्त्यावर साचल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या पाण्यातून मार्ग काढत वाहने चालवावी लागत आहे..
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून कल्याण-डोंबिवली परिसरात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, केवळ दहा मिनिटांच्या मुसळधार पावसानेच शहरातील नियोजनाचा फज्जा उडवला आहे. कल्याणच्या विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नाशिकच्या सिडको परिसरातील कामटवाडा रोड येथील एका खाजगी शाळेमधून मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या दोन पालकांना शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच भरधाव कारने धडक दिली आहे. यात दोन्ही जण जखमी झाले आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर पालकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले.
गडचिरोली महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणात पाण्यात प्रचंड वाढ झाली आहे. मेडिगट्टा धरणाची धोका पातळी 104.75 झाली आहे. यामुळे दक्षिण भागात पूर परिस्थिती निर्माण होत आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मतदान झाले आहे. आज मतमोजणी होणार आहे. चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या इमारतीत मतमोजणी होईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 संचालकांपैकी 14 हे बिनविरोध निवडून आले आहेत. 7 जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे
पश्चिम विदर्भात १ ते १९ जुलै या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याच काळात झालेल्या पावसामुळे ८४ हजार ८८ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे पश्चिम विदर्भात आजपर्यंत ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ५२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे, ज्यामुळे शेती क्षेत्रातील गंभीर परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात भूमिगत गटार साफ करताना विषारी वायूमुळे श्वास गुदमरून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी सांडपाणी प्रकल्पाच्या कामादरम्यान घडली. मृत कामगारांची नावे अतुल रतन पवार (19) आणि रियाज पिंजारी (22) अशी आहेत. या दुर्घटनेत आणखी एक कामगार गंभीर असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. नगरपालिका ठेकेदाराकडे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कल्याण-डोंबिवली परिसरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. सध्या ढगाळ वातावरण असून, रिमझिम पाऊस सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने जोरदार सरीही बरसत आहेत. सध्या पावसाचा वेग कमी असल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत आहे. मात्र, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर दुपारनंतर शहरातील सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.