
मोठी बातमी समोर आली आहे, अखेर खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथून अटक केली आहे. आतापर्यंत खोक्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. तो एका व्यक्तीला मारहाण करत असतानाचा व्हिडीओ देखील समोर आला. त्यानंतर एका व्हिडीओमध्ये तो पैसे उधळताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. त्याने आपल्या जातीची खोटी माहिती देऊन भाजपकडून पद देखील मिळवल्याची माहिती समोर आली आहे. आता खोक्याचे आणखी दोन करानामे समोर आले आहेत.
काही दिवसांपूर्वी पोलीस आणि वनविभागाकडू खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घराची झडती घेण्यात आली होती. त्याच्या घरामध्ये वनविभागाला जनावरांचं सुकलेलं मांस, आणि शिकारीचं साहित्य आढळून आलं होतं. त्याने आतापर्यंत दोनशे पेक्षा अधिक हरणांची शिकार केल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे, तसेच हरणाची शिकार करायला विरोध केला म्हणून त्याने ढाकणे कुटुंबातील दोघांना बेदम मारहाण केल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. इतके दिवस फरार असलेल्या खोक्याच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान आता खोक्याचे आणखी काही कारनामे समोर आले आहेत.
या प्रकरणात वनविभागाकूडन खोक्याच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला, आठ मार्च रोजी वनविभागाने खोक्या भाईच्या घराची झडती घेतली होती. या झडतीमध्ये त्याच्या घरात वाळलेलं जनावरांचं मांस आढळून आलं होतं. तसेच शिकारीचं साहित्य आढळून आलं होतं. या आधारे खोक्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच वन वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्याप्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसले वर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याला या प्रकरणात नोटीस देखील देण्यात आली आहे. अतिक्रमण प्रकरणात सात दिवसांच्या आत मालकी हक्क दाखवा, अन्यथा सात दिवसात मालकी हक्क दावा सिद्ध न केल्यास वन विभाग पुढील कारवाई करून अतिक्रमण काढण्याची शक्यता आहे.