Shivsena Dispute: दिल्लीतून फोन, गुवाहाटीत मला संपवण्याचा कट.. ठाकरेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट!
शिंदे गटातीलच एका आमदाराने सांगितले होते, दिल्लीवरुन फोन आला होता. अटॅक आला असं सांगून मला गेम करण्याचा कट होता. आमचा रामराम तिथेच करायचा होता," असा खळबळजनक दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.

गणेश सोनोने, प्रतिनिधी: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली, त्यावेळी माघारी परतणाऱ्या एका आमदाराचे ‘राम राम सत्य’ होणार होतं, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत खळबळजनक दावा केला आहे.
काय म्हणाले नितीन देशमुख?
“आमचा रामनाम सत्य करणारा कोण? संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे, तर आमचा रामनाम सत्य का होणार होता? आम्ही पक्षाशी प्रामणिक राहिलो म्हणून आमचा रामनाम सत्य होणार होता का? असा सवाल करत गुवाहाटीवरुन आल्यानंतर मला शिंदे गटातीलच एका आमदाराने सांगितले होते, दिल्लीवरुन फोन आला होता. अटॅक आला असं सांगून मला गेम करण्याचा कट होता. आमचा रामराम तिथेच करायचा होता,” असा खळबळजनक दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.
“मारनेवाला भगवान, बचाने वाला भगवा. हा माझा पूनर्जन्म आहे, आमचा राम नाम सत्य सुरतमध्य़े होणार होता. दिल्लीत कोणाचा नेमका फोन होता माहिती नाही शिरसाटही म्हणतात राम नाम सत्य होणार होता.आता त्यांनीच क्लिअर करावं कोण राम नाम सत्य करणार होते? आता सरकार चौकशी करणार का, एफआयआर दाखल करणार का? आम्ही रस्त्यावर उतरतो, सरकारच्या विरोधात आंदोलन करतो आमच्या जीवाचं बरवाईट केलं तर काय करणार? माझं हे आयुष्य शेतकरी आणि ठाकरेंसाठी आहे,” असंही नितीन देशमुख म्हणाले.
माझं मिशन फेल… शिंदेंनी पिस्तुल काढलं!
दरम्यान, गुवाहाटी प्रकरणावेळी हॉटेलला माझी आणि शिंदेंची शाब्दिक चर्चा झाली. “नितीन कोणत्याच परिस्थिती थांबत नाहीयेस मी तुला खुप सहकार्य केलं असं ते म्हणाले. मी म्हणालो तुम्ही पक्षाचे नेते होता म्हणून सहकार्य कराल, पक्षाचे नेते होते शोषण थोडीच कराल. तु सगळं खराबी करतोय माझं मिशन फेल जाईल असं ते म्हणाले. त्यानंतर एकनाथ शिंदे सहज म्हणाले, पिस्तुल आण माझ्याच डोक्यात मारुन घेतो. त्यांना मी सांगितलं तुम्ही असं करु नका मीच माझ्या डोक्यात मारुन घेतो. त्यानंतर पोलीस आले. मला हॉस्पिटलमध्ये नेल, आमची दुसऱ्या दिवशी चर्चा झाली ती चर्चा काय ते सांगू शकणार नाही,” असा खुलासाही यावेळी नितीन देशमुख यांनी केला आहे.