काही जणांचा फोन 2019 नंतर.., उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर, त्या टोलेबाजीवर जशास तसं भाष्य!
आपल्या आजच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी पुस्तकं वाचण्याचं महत्त्व विशद केलं. तसेच संजय राऊत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही किस्से सांगितले.

Uddhav Thackeray : काही जणांचा फोन 2019 सालानंतर थांबला तो थांबला, असे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे नाव न घेता दिले. खासदार संजय राऊत यांच्या बोध कीर्तन नावाच्या पुस्तकाचे आज (31 ऑक्टोबर) प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी मंचावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी काय टोलेबाजी केली होती?
ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘महाराष्ट्राची हास्यरेषा’ या पुस्तकाचे 29 ऑक्टोबर रोजी प्रकाशन झाले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस तसेच राज ठाकरे एकाच मंचावर होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना मिश्कील टोला लगावला होता. 2019 सालापर्यंत उद्धव ठाकरेंनी जेव्हा-जेव्हा फोन केला तेव्हा-तेव्हा मी गेलो. 2019 सालानंतर त्यांनी बोलावलंच नाही, असं मिश्कील विधान फडणवीसांनी केलं होतं. त्यालाच उद्धव ठाकरे यांनी आजच्या राऊतांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उत्तर दिलं.
काही जणांचा फोन 2019 नंतर….
आपल्या आजच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी पुस्तकं वाचण्याचं महत्त्व विशद केलं. तसेच संजय राऊत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही किस्से सांगितले. “सामनात काही गडबड असेल तर मी संजयला फोन करायचो. तोपर्यंत बाळासाहेबांचा राग शांत झालेला असायचा. ओव्या कोणाला द्यायच्या शिव्या कोणाला द्यायच्या हे संजय राऊतांना कळतं. आजकाल लिखाण नाहीसं होत चाललं आहे. आताच्या पिढीला काही हवं असेल तर chat gpt आहे. आज वाचण्याची वेळ राहिली नाही, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले. तसेच भाषणाच्या शेवटी ‘काही जणांचा फोन थांबला. काही जणांचा 2019 सालानंतर फोन थांबला तो थांबला, असे भाष्य उद्धव ठाकरेंनी केले.
दरम्यान, या कार्यक्रमात राज ठाकरे यांनीदेखील भाषण केले. त्यांनही राजकीय भाष्य न करता आपल्या खुमासदार शैलीत भाषण केले. संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे काही किस्से त्यांनीदेखील सांगितले.
