संघाला 100 वर्ष झाली पण …, तुमचं समाधान होतंय का? ठाकरेंचा थेट मोहन भागवत यांना सवाल

आज मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी मेळाव्यातून थेट मोहन भागवत यांना सवाल केला आहे.

संघाला 100 वर्ष झाली पण ..., तुमचं समाधान होतंय का? ठाकरेंचा थेट मोहन भागवत यांना सवाल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2025 | 8:40 PM

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज मुंबईमध्ये भर पावसात पार पडला, या मेळाव्यातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी दसरा मेळाव्यामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट सावाल करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

संघाला शंभर वर्ष झाल्यानंतर मी मोहन भागवत यांना प्रश्न विचारतोय, भागवत साहेब हे तुमचे चले चपाटे आहेत, संघाला शंभर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान वाटतंय का? ज्या कामासाठी संघानं शंभर वर्ष मेहनत केली, आणि त्या मेहनतीला लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यावर तुमचं समाधान होतय का? तुम्हाला आनंद मिळतोय का? असा थेट सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालकांना केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  मला असं वाटतं की, कदाचित  भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू हा ब्रह्मदेवांचा बाप होण्याचा असेल, पण हे ब्रह्मदेव नाही झाले ब्रह्मराक्षस झाले आहेत. मुद्दामहून मी तुम्हाला सांगतोय, मी इथे ब्रह्मराक्षस हा शब्द वापरत आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवर ब्रह्मराक्षस या शब्दाचा अर्थ सर्च करा. हिंदूत्त्व हिंदूत्व म्हणून हे  आमच्या अंगावर येतात, मात्र  काही दिवसांपूर्वी  वृत्तपत्रात आलेल्या या काही बातम्या आहेत, ‘मुस्लिमांबद्दल मोहन भागवत यांच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय, आता संघ मुस्लिमांच्या घराघरात पोहोचणार’ ‘मुस्लिम आणि हिंदूंमधील दुरी कमी करण्यासाठी संघ प्रयत्न करणार’ या काही पेपरमधील बातम्या आहेत. मग आता मी भाजपवाल्यांना प्रश्न करतो, तुमच्या आहे का हिंमत? मोहन भागवत यांनी हिंदूत्व सोडले म्हणायची, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना भाजप हा अमिबा असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे, अमिबाला कसलाही आकार नसतो तो कसाही वेडा वाकडा असतो, मात्र तो एक पेशीय जीव आहे. तसंच भाजपचं झालं आहे, भाजप हा कसाही जिकडे जागा भेटेल तिकडे वेडा वाकडा वाढत आहे, मात्र एक पेशीय मी म्हणेल तेच खरं आसा टोला यावेळी ठाकरे यांनी लगावला आहे.