अजितदादांच्या राष्ट्रवादीतील 5 जणांचं मंत्रिपद जाणार? ठाकरे गटामधून पहिली प्रतिक्रिया, कोण काय म्हणाले?
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील 5 जणांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या राजकीय वर्तुळातील चर्चेवर ठाकरे गटाच्या नेत्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अर्थ खात्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या 5 मंत्री बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. आता यावर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारची हूल उठवली जाते, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी म्हटलं आहे.
अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवर दानवे म्हणाले, ‘ राष्ट्रवादी पक्षात काही विरोधात हालचाली सुरू झाल्या की अशा पद्धतीने मंत्रिमंडळ वाढणार अशा प्रकारची हूल उठवली जाते. परंतु दोन अडीच वर्षे कोणत्याही प्रकारे मंत्र्याचं खाते आणि मंत्री बदललं जाणार नाही’. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर दानवे म्हणाले, ‘आग्रही जरी असले तरी भाजप मला वाटत नाही की, त्यांना अर्थ खाते देईल. कारण अजितदादा हे वेगळ्या ताकदीने अर्थ खाते चालवणारे मंत्री होते.दुर्दैवाने दादाच्या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टीच्या ताटात ते खाते आलं आणि जे भाजपच्या ताटात आलं, वाटाघाटीत भारतीय जनता पार्टीचे धोरण असं असतं की जास्तीत जास्त वाटा आपलाच असतो आणि घाटा समोरच्याला असतो. शिष्टमंडळ भेटलं तरी भारतीय जनता पार्टीला कोणतेही यश मिळणार नाही असं वाटतं’.
छगन भुजबळांच्या विधानावर दानवे म्हणाले, ‘मुख्यमंत्री सगळ्यांनाच हो म्हणतात. गुबू गुबू म्हटल्यावर हो म्हटलं जातं, तसं मुख्यमंत्री सगळ्यांनाच हो म्हणतात. ते आतापर्यंत कोणत्याच विषयाला नाही म्हटले नाही’. राज्यात राजतकीय उलथापालथ होईल, असा दावा गणेश नाईक यांनी केला. त्यावर दानवे म्हणाले, ‘ देशात कोणी म्हणतं काही होईल, कोणी म्हणतं राज्यात काहीतरी होईल’. राज ठाकरेंनी पोस्ट डिलीट केली, त्यावर म्हणाले, ‘पोलिसांनी विनंती केली असेल. मात्र राज ठाकरे बोलले ते सत्यच आहे’. तर नितेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दानवे म्हणाले, ‘याला काही अर्थ असतो का… यांनी लावावेत आणि मुसलमानाने लावू नयेत हे काय धंदे झाले’.