पुण्यात अमित ठाकरेंनी PM मोदींचा फोटो हटवला, राज यांच्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले…
पुण्यात अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका कॉलेजमधून PM मोदींचा फोटो हटवला होता. त्यावर आता उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेशेजारी असलेल्या पंतप्रधान मोदींचा फोटो अमित ठाकरेंनी हटवल्याने मोठा वाद झाला होता. अमित ठाकरेंच्या सूचनेनंतर मनसे कार्यकर्त्याने मोदींचा फोटो हटवला होता. यावरून पुण्यात अमित ठाकरेंच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणावरुन राज ठाकरेंनी अमित यांच्या कृतीचं समर्थन दिलं. आता राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी अमित यांच्या कृतीला योग्य ठरवलं आहे. महापुरुष आणि पंतप्रधानांची तुलना व्हायला नको, असे त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘प्रोटोकॉल हा विषय असतो. पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर जे कोणी बसतील. आजपर्यंत अनेक जण बसून गेले आहेत. त्यावर आपले पंतप्रधान बसले आहेत. भविष्यात दुसरे कोणी बसणार आहेत. त्यामुळे प्रोटोकॉल आणि दैवतांचा फोटो वेगळा असला पाहिजे. दैवत कोणी बदलू शकत नाही. प्रोटोकॉलप्रमाणे माणसे बदलू शकतात. पद मिळवण्यासाठी माणसे पक्ष बदलू शकतात. आम्ही दैवत बदलू शकत नाही. त्यामुळे दैवतांच्या बरोबर प्रोटोकॉलची माणसी नसावीत. तुम्ही वेगळी भिंत ठेवा. सरकारी भिंतीवर सरकारी माणसं पाहिजे. सरकार कोणत्या राज्याचं आहे, देशाचं आहे… तेथील महापुरुष आणि त्यांची तुलना व्हायला नको. दोन्ही फोटो वेगळे लावा’.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरही भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी नवी मागणी केली. ठाकरे म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांना सरकार चालवता येईना झालं आहे. आमचं पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळायला हवं, अशी आमची भूमिका आहे. या मागणीसाठी केस दाखल व्हायला नको होती. परंतु बोगस पद्धतीने सगळं घेण्यात आलं आहे. सगळे हातोडे आमच्याच डोक्यावर मारले जाताहेत. या प्रकरणात चार वर्ष निघून गेलं. दोन मोठ्या निवडणुका होऊन गेल्या. तिसरी म्हणजे महापालिकेची निवडणूक झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. तारीख पे तारीख सुरू आहे. कोणत्याही कारणात्सव निकाला वेळ लागत असल्यास धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून टाका, अशी आम्ही मागणी केली. धनुष्यबाण चिन्हाचा दुरूपयोग करून सत्ता मिळवण्यात आली आहे. त्यानंतर आता गैरकारभार सुरू आहेत. पायबंद घालावेत, अशी आमची मागणी असल्याचे ठाकरेंनी म्हटलं.