Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट, उद्धव ठाकरेंचा आमदार महायुतीच्या गोटात? राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politcs : राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या दाराने जिल्हा बँकेच्या निवडवणुकीत महायुती पॅनलला पसंती दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

९ पैकी ६ खासदार फुटल्याने उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसलाय. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांनी अचानक साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे आखले आहेत. ठाकरेंच्या निशाण्यावर आता बंडखोर खासदार आहेत. तर दुसरीकडे खासदारांनंतर आमदार देखील फुटणार असल्याचा दावा महायुतीमधील नेते करत आहेत. या दावादरम्यान उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जाणारे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलला पसंती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा बँक निवडणुकीत चक्क भाजप आणि महायुतीसोबत जाण्यास पसंती दर्शवली आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन पॅनल झाले आहेत. यामुळे अंबादास दानवे यांनी मविआऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्यास पसंती दिली आहे. ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत ८ जण बिनविरोध संचालक झाले आहेत. यंदा १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. बिनविरोधचा प्रयत्न फसल्यानंतर महायुती आणि मविआचे पॅनल बनले आहे. या दोन्ही पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. विशेष म्हणजे मविआचे पॅनल बनले असतानाही अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय.
बँक निवडणुकीतील हा निर्णय स्थानिक पातळीवरील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु चार दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण बाबीवर बँकेत पक्षीय राजकारण नसते, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली आहे. तसेच स्थानिक पातळीवरील निर्णय असल्याचेही अधोरेखित केले. अंबादास दानवे यांच्या भूमिकेवर पक्षातील वरिष्ठ नेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दानवेंच्या भूमिकेवर पक्षातील वरिष्ठ नेते काय बोलतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.