
येत्या 5 तारखेपासून मी मराठवाड्यात संवाद दौऱ्यावर जाणार आहे. शेतकऱ्यांशी मी थेट संवाद साधणार आहे. दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील असं पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. काही हजार कोटी तिजोरीतून रिलीज केले असं ते म्हणतात, तर ते पैसे मिळाले का याबद्दल विचारणार आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey ) यांनी सांगितले. नुसती आगपाखड करायला किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही, पण ते पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील संवाद दौऱ्याची योजना मांडली. शेतकऱ्यांना मदत मिळाली का याची पाहणी करणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
जे पॅकेज जहीर केलं त्यातलं तरी काय मिळालं ?
आज शेतकऱ्याला बाकी मदतीची गरज आहेच पण सर्वात आधी ज्यांची जमीन खरडून गेली आहे, ती पूर्ववत करण्यासाठी ते पहिले माती मागत आहेत. ती मातीच जर त्यांना मिळाली नसेल तर पुढच्या गोष्टी कशा होणार ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. दर हेक्टरी 50 हजार रुपये ही शेतकऱ्यांची मागणी आहे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही त्यांची मागणी आहे. इतरही अनेक बाबी आहे. मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे. जे पॅकेज जाहीर केलं होतं,त्यातलं तरी किती मिळालं असा सवाल शेतकऱ्यांना विचारणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांशी प्रामाणिकपणे वागलो, तसं हे सरकार का वागत नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
खरडून गेलेल्या जमीनीला तीन- साडेतीन लाख मनरेगातून देणार होते. दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यात टाका, मग पुढे पैसे नंतर द्या अशी मागणी आम्ही काढलेल्या मोर्चादरम्यान मी केली होती. पण तेही पैसे दिलेत असं वाटत नाही. सरकार नेमकं काय करणार आहे ? आत्तापर्यंत घोषित झालेल्या पॅकेजपैकी शेतकऱ्याच्या हातात काय मिळालं हेही पाहणार असल्याचं उद्धव यांनी सांगितलं.