Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मनसे सोबत युती करायला तयार, पण एक अट…

Uddhav Thackeray : नरसिंह रावांना 14 भाषा यायच्या. उत्तम मराठी बोलायचे. कुठे सक्ती होती. माझे वडील आणि प्रबोधनकार यांनी 7 वीत शाळा सोडली. पण शिकायचं असेल तर कसाही शिकतो. फडणवीस तुम्ही जे काही गडबड घेतलेत त्यांना हिंदी काय मराठी सक्तीचं करा. त्यांना मराठी कसं बोलायचं ते शिकवा. तुमचे सहकारी सुशिक्षित आहेत का? मी वाद करत नाही. पण ते कॅपेबल आहे का? केवळ गद्दारीची सर्टिफिकेट घेऊन त्यांना पदं दिलीत का? किती वेळा पक्ष बदलला. वा... ये डबल ग्रॅज्युएट आहे ये माझ्याकडे. ही अशी लोकं राज्याचं शैक्षणिक धोरण ठरवत आहेत" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackeray :  उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मनसे सोबत युती करायला तयार, पण एक अट...
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 19, 2025 | 2:14 PM

“मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बातमी वाचल्यावर कळेल, किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे. मी सुद्धा सर्व मराठी माणसांना मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहे” असा प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिला आहे. ते दादरला भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलत होते. “या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे” असं राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देताना एक अट ठेवली आहे. “माझी अट एक आहे. जेव्हा आम्ही लोकसभेत सांगत होतो. महाराष्ट्रातून गुजरातला कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर हे सरकार बसलं नसतं. आज महाराष्ट्राच्या हिताचं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि राज्यातही महाराष्ट्राच्या हिताचं सरकार बसवलं असतं. त्याचवेळी काळे कामगार कायदे फेकून दिले असते केराच्या टोपलीत. तेव्हा पाठिंबा द्यायचा. आता विरोध करायचा आणि परत तडजोड करायची असं नाही. महाराष्ट्राचं हित त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत करणार नाही, त्याला मी बोलावणार नाही. त्याच्या घरी मी जाणार नाही. त्याचं आगत स्वागत, पंगतीला बसवत नाही, हे आधी ठऱवा मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मग टाळी देण्याची हाळी द्यायची’

“बाकी आमच्यातील भांडणं, माझ्याकडून नव्हतीच कुणाशी. मिटवून टाकली. चला पण हे ठरवा. महाराष्ट्राचं हित. मग त्यावेळी सर्व मराठी माणसांनी ठरवायचं भाजपसोबत जायचं की माझ्यासोबत. म्हणजे आपल्या शिवसेनेसोबत.एसंशि नाही. गद्दार सेना नाही. पण ठरवा. कुणासोबत जाऊन मराठी आणि महाराष्ट्राचं हित होणार आहे. माझ्याबरोबर की भाजपबरोबर. मग काय द्यायचं असेल तर पाठिंबा द्या किंवा विरोध करा. बिनशर्त करा. माझी काही हरकत नाहीये. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे. पण या चोरांना गाठीभेटी आणि कळत न कळत गाठीभेटी आणि त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची शिवाजी महाराजांची. मग टाळी देण्याची हाळी द्यायची” असं उद्धव ठाकरे म्हणाले.