
काँग्रेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय, यावर तुमची काय प्रतिक्रिया काय आहे, असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला आहे. “त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. माझा पक्ष स्वतंत्र आहे,” असं ते म्हणाले. काँग्रेस आणि शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांवरही त्यांनी रोखठोक उत्तर दिलं. “उंबरठा हा शब्द चुकीचा आहे. त्यांचा पक्ष त्यांचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे आणि आमचा पक्ष आमचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी जाहीर केलं होतं. मुंबईत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबतही जाणार नसल्याची घोषणा त्यांनी केली.
“भाजप प्रादेशिक पक्ष संपवायला निघाले आहेत. भाजपला राष्ट्रगीत शिकवलं पाहिजे. त्यात पंजाब, सिंध, महाराष्ट्र आहे. या प्रादेशिक अस्मिता मारायला भाजप निघाला आहे. अनेकतेत एकता आहे. ती एकता मारण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणं हा काँग्रेसचा निर्णय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादीशी त्यांची अद्याप चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे आणि मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते चर्चा करतील. काँग्रेससोबत संपर्क साधून योग्य तो निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
शिवसेना-मनसेची होणारी संभाव्य युती लक्षात घेता हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर होणारी फरफट रोखण्यासाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई काँग्रेसचं मालाडमध्ये एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यात मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित झाल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने एकत्र लढण्याची भूमिका घेतली आहे.
महाविकास आघाडीने मनसेला बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याची शिवसेना ठाकरे गटाची योजना होती. या दृष्टीने खासदार संजय राऊतांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी प्राथमिक चर्चा केली होती. काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याचा मतप्रवाह होता. दिल्लीतील केंद्रीय नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा झाली.