Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक रद्द करा, निवडणूक आयोगातील मतभेदांचं सत्य समोर येताच उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
Uddhav Thackeray :निवडणूक आयोगाबाबत इंडियन एक्सप्रेसने मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक आयोगात एकवाक्यता नसल्याचं समोर आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांवर दोन्ही निवडणूक आयुक्तांनी काही आक्षेप घेतले होते.

निवडणूक आयोगाबाबत इंडियन एक्सप्रेसने मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक आयोगात एकवाक्यता नसल्याचं समोर आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांवर दोन्ही निवडणूक आयुक्तांनी काही आक्षेप घेतले होते. ही बाब समोर येताच काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन दिल्ली आणि हरियाणातील विधानसभेच्या झालेल्या निवडणुका रद्द करा, अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. “देशांतर्गत, पक्षांतर्गत लोकशाही कशी राबवली जाते की नाही हे बघणारा निवडणूक आयुक्त नेमणुकीद्वारे नेमला जातो. त्याची निवडणूक का होत नाही?. मग हा कोणाच्या मर्जीने नेमला जातो? कोण नेमतो याला? मर्जीने याची नेमणूक होत असेल तर त्यांच्या घरचं पाणी भरणार. तो पाणी भरताना इतकं पाणी भरतोय की त्यात देशाची लोकशाही बुडतेय” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. सुखबीर संधू आणि विवेक जोशी यांना, तुम्ही धाडसं दाखवलं. आता तुमच्या लक्षाय येत असेल, म्हणून मी विचारलं, तुम्ही सगळे चॅनलवाले पत्रकार परिषदा दाखवता का? चॅनलने त्या भयातून बाहेर येणं गरजेचं आहे. आता जनता रस्त्यावर उतरली तर मात्र काही सांगता येत नाही. तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहात. लोकशाहीचा होत असलेला हा खून, पक्ष फोडणारी दरोडेखोरांची टोळी याचा पर्दाफाश जनतेसमोर आला पाहिजे” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
निवडणूक आयुक्तांनी भांड फोडलेलं आहे
“मी चॅनलना विचारतोय तुमच्यात एकमत करा. लोकशाही वाचवा. आम्ही लढतच आहोत. आम्ही विरोधी पक्ष जनतेचे प्रतिनिधी आहोत. जनता आता नुसती मन की बात ऐकणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आपल्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्यावेळी बेकायदेशीर सरकार होतं. निवडणूक आयुक्तांनी भांड फोडलेलं आहे. कसा मनमानी कारभार चालत होता. पश्चिम बंगालमध्ये 90 लाख मतदार वगळले. महाराष्ट्रात 45 लाख मतदार घुसवले. 40 लाखांवर आक्षेप घेतला होता. मी, राज आम्ही मविआने मोर्चा काढलेला” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्ञानेशकुमारला तात्काळ तुरुंगात टाकलं पाहिजे
“इथल्या निवडणूक आयुक्तांना विचारलं, ते बोलतात आमच्याकडे पावर नाही. मग पावर कोणाकडे आहे?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलं. “म्होरक्या कोण आहे? ज्ञानेशकुमारला तात्काळ तुरुंगात टाकलं पाहिजे, मग त्याच्या म्होरक्याला तुरुंगात टाकून या सगळ्या प्रक्रियेचा पुनर्विचार झाला पाहिजे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका रद्द करुन इथल्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. विरोधी पक्षात मतभेद असले तरी बॅलेट पेपरच्या मुद्यावर एकत्र आलं पाहिजे” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.