
“आम्ही कर्जमाफीची मागणी केली. आपल्याकडे अनेकदा शब्दांचा खेळ केला. एखादी संज्ञा नाही, शब्द नाही म्हणून मदत नाकारणार आहात का? ओला दुष्काळ हा शब्द नसेल, पण माणसाच्या पदानुसार शब्द बदलतो का? माझ्याकडे एक पत्र आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेत्याने मला पत्र पाठवलं होतं. तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. 16 ऑक्टोबर 2020 चं पत्र आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात पूरस्थितीमुळं शेतकऱ्याची वाईट स्थिती आहे, त्यावर उद्धव ठाकरे बोलत होते.
“विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहे, असं फडणवीस म्हणाले होते. विरोधी पक्षनेते असतानाच वेदना होतात का? मुख्यमंत्री असताना होत नाही का? मला वेदना झाल्या होत्या. त्यामुळे मी कर्ज माफी केली होती. फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. गिचमिड म्हणजे देवेंद्र फडणवीस. गिचमिड म्हणजे त्यांची सही. कळली नाही म्हणून” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
‘ओला दुष्काळ म्हणा किंवा तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा’
“पंतप्रधानांना भेटले, अजून यांचा अभ्यास आणि प्रस्ताव सुरू आहे. केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलं नाही. येणार केव्हा? येणार की नाही? आल्यावर पाहणी होणार कधी? पंचनामे होणार कधी? निर्दयीपणे हा कारभार चालला आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. ओला दुष्काळ म्हणा किंवा तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली.
‘हेक्टरी 50 हजार द्या’
“हेक्टरी 50 हजार द्या. पंतप्रधान योजनेसारखी ग्रामीण योजना आणा. शेतकऱ्यांचे निवारे आणि खोपटे वाहून गेले. निकष काय तर घरात 48 तास पाणी असावं. हे कसले निकष. पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून द्या. शाळाही सुरू करा. मी पश्चिम महाराष्ट्रात छावण्यांना भेट दिली होती. कॉलेज आणि इमारतीत राहण्याची व्यवस्था केली होती. असा पाऊस झाल्यावर रोगराई पसरू शकते. त्यामुळे या लोकांना चांगल्या ठिकाणी हलवण्याची गरज आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.