Uddhav thackeray : ही तर भाषिक आणीबाणी… उद्धव ठाकरे यांचा तुफान हल्लाबोल
Uddhav thackeray : "आम्हाला हिंदीचं वावडं नाही. हिंदी सक्तीची याचा अर्थ कालांतराने एक निशाण, एक विधान म्हणजे मीच. एकाधिकारशाहीकडे यांची वाटचाल सुरू आहे. आता ते भाषिक आणीबाणी लादत आहेत" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात शाळेत पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे, उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, महापालिकेच्या निवडणुका आहेत. “ही आंदोलनाची सुरुवात असेल. जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की राज्यात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही तर सादरीकरणाची गरज नाही. हे दळण कशासाठी दळत आहात” असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. “मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, बटेंगे तो कटेंगे. आता बाटेंगे आणि काटेंगे हे धोरण दिसतंय. जे काही चांगलं इतर भाषिकात आहे. त्यात मिठाचा खडा टाकला जात आहे. विषाचा खडा टाकला जात आहे. हा माझा समज आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“हिंदी भाषेला विरोध नाही. हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टी आहे. अनेक कलाकार महाराष्ट्रात मोठे झाले. महाराष्ट्रात हिंदी चित्रपट तुफान चालतात. आम्हाला हिंदीचं वावडं नाही. हिंदी सक्तीची याचा अर्थ कालांतराने एक निशाण, एक विधान म्हणजे मीच. एकाधिकारशाहीकडे यांची वाटचाल सुरू आहे. आता ते भाषिक आणीबाणी लादत आहेत. ही भाषिक आणीबाणी आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही कोणतीही सक्ती लादून घेणार नाही
“शिवसेनेतील गद्दार जे मिंधेपणाने राहतात त्यांना बाळासाहेबांचे विचार मराठीत सांगण्याची गरज आहे. आम्ही कोणतीही सक्ती लादून घेणार नाही. आम्हाला सादरीकरण नको. आम्हाला हिंदी नकोच. हिंदी सर्वांना येते. कुणाला येत नाही. तुम्ही भाषा जबरदस्ती करणार का? आम्ही चालू देणार नाही. आपला देश संघराज्य पद्धतीचा आहे. मांडणी भाषावार प्रांत रचनेनुसार झाली आहे. भाषा मिळाली, राज्याला मुख्यमंत्री मिळाला” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
