
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. आज 29 महानगर पालिकांसाठी महापौर पदाची सोडत निघणार आहे. काही महापालिकांमध्ये कुठल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर परस्परांविरोधात लढलेले पक्ष एकत्र येत आहेत. अशीच एक आघाडी कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये आकाराला येण्याची चिन्ह आहेत. केडीएमसीमध्ये ठाकरे बंधुंनी एकत्र निवडणूक लढवली होती. पण निकलानंतर मनसेने एक वेगळा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकीच्या महिनाभराआधी आकाराला आलेली ठाकरे बंधुंची युती यामुळे तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मनसेचा हा निर्णय अजिबात पटलेला नाही. त्यामुळे संजय राऊत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज सकाळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. याआधी संजय राऊत हे अनेकदा मातोश्रीवर येऊन गेले आहेत. युती आकाराला आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. पण आजची त्यांची भेट, त्यामागचं कारण पूर्णपणे वेगळं आहे. केडीएमसीत सत्ता स्थापनेसाठी मनसेने घेतलेली भूमिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मान्य नाहीय. काल संजय राऊत यांनी युतीत बेबनाव निर्माण होऊ नये, यासाठी या निर्णयाशी राज ठाकरे यांचा काहीही संबंध नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला.
बाजू सावरण्याचा प्रयत्न
केडीएमसीत जो निर्णय झाला, त्या बाबत राज ठाकरे पूर्णपणे अनभिज्ञ होते. राज ठाकरे यांना या निर्णयाबद्दल माहित नव्हतं. केडीएमसीच्या निर्णयामुळे राज ठाकरे व्यथित झाले आहेत, असं सांगून संजय राऊत यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केडीएमसीमधील मनसेच्या स्थानिक नेत्यांवर टीका सुद्धा केली. केडीएमसीमध्ये राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना केलेलं सहकार्य उद्धव ठाकरे गटाला पटलेलं नाही. त्यामुळे संजय राऊत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरसावले आहेत. कल्याण डोंबिवलीत एकूण 122 नगरसेवक बसतात. त्यात 53 जागा शिंदे यांच्या शिवसेनेने, 50 ठिकाणी भाजप, पाच मनसे आणि 10 ठाकरे गटाचे निवडून आले आहेत. बहुमतासाठी 62 नगरसेवकांची आवश्यकता आहे.