
MNS Deepotsav : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेचा ठाकरे गट एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कथित युतीला मूर्त रुप देण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेकवेळा एकत्र आले आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी भेटले होते. ही एक कौटुंबिक भेट होती. असे असतानाच आता उद्धव ठाकरे मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. दरवर्षी हा कार्यक्रम मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आयोजित केला जातो. या कार्यक्रमात दीपावलीनिमित्त आकर्षक रोषणाई केली जाते. याच कार्यक्रमाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज ठाकरे हेदेखील उपस्थित असतील. म्हणजेच दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा महाराष्ट्राला एकत्र दिसणार आहेत. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाषण करण्याचीही शक्यता आहे. याआधी 2022 साली मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता त्यांचीच जागा यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
या कार्यक्रमाची एक निमंत्रण पत्रिकादेखील समोर आली आहे. या निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेखही आहे. मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाची दरवर्षी चर्चा असते. याआधीच्या दीपोत्सवात सध्या मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस तसेच सध्या उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनीदेखील हजेरी लावलेली आहे. मनसेच्या या दीपोत्सवात वेगवेगळे कलाकारदेखील उपस्थित असतात. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.