मोठी बातमी! काल ऑफर, आज उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, त्यामुळे चर्चाला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! काल ऑफर, आज उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2025 | 3:46 PM

थोड्याच वेळात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खेळीमेळीचा संवाद पाहायला मिळाला होता, आणि त्याचवेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. तुम्हाला सत्तेत येण्यासाठी स्कोप आहे, असं म्हटलं होतं. त्यावर चर्चा सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे हे आज फडणवीसांची भेट घेणार आहेत. ही भेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात होणार आहे, उद्धव ठाकरे राम शिंदे यांच्या कार्यालयात पोहोचले आहेत.

फडणवीसांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं, तुम्हाला इकडे येण्यासाठी स्कोप आहे, तुम्ही येऊ शकता असं म्हटलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची भेट होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होणार आहे? हे अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र या भेटीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पाच जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा पार पडला होता, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधुंची मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती.  तब्बल वीस वर्षांनंतर हे दोन्ही बंधु एकत्र आले होते, त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे हे अजूनही या युतीबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहेत. दुसरीकडे आता आज उद्धव ठाकरे हे फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. सर्वच पक्षांकडून आता महापालिका निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू आहे, त्यापूर्वीच ही भेट होत असल्यानं या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.