
उत्तराखडंच्या धारली गावात काल ढगफुटी झाली आणि एका क्षणात सगळंच उध्वस्त झालं. पुराचं पाणी गावात शिरलं आणि एकच हाहा:कार माजला.यामुळे आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण चिखलात, ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त आहे. धारली गावासह अनेक ठिकाणी ढगफुटीचा फटका बसला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक पर्यटक, भाविक सध्या उत्तराखंडमध्ये असून या ढगफुटीमुळे, दुर्घटनेमुळे ते तिथेच अडकले आहेत. त्यात पुणे, सोलापूर, नांदेड असा विविध भागातील लोकांचा समावेश आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दमधील 90 सालच्या बॅचमधील 19 जण उत्तराखंडमध्ये बेपत्ता ?
दरम्यान आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 1990 सालच्या 10 वी च्या बॅचमधील 8 पुरुष आणि 11 महिलांचा एक समूह पर्यटनासाठी 1ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काल सकाळी या समूहातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी त्या परिसरात काही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आल्याने त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक सर्वांनाच काळजी वाटू लागली.
विशेष म्हणजे, हा सर्व समूह त्या भागातच असल्याचे सांगितले जात आहे.काल या समूहातील एका महिलेने तिच्या मुलाला कॉल करून “आम्ही सर्वजण सुखरूप आहोत,” असे सांगितले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. स्थानिक प्रशासन, उत्तराखंड पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा या प्रकरणाचा तपास घेत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
सोलापुरातील चार तरुण अडकले
उत्तराखंडला पर्यटनासाठी गेलेले सोलापुरातील चार तरुणही तेथे अडकले आहेत. काल सकाळी 11 वाजता या तरुणांनी कुटुंबियांशी संपर्क करत गंगोत्री येथे असून सुखरूप असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर कालपासून चौघांचेही फोन लागत नसल्याने कुटुंबिय चिंतेत आहेत. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे असे या अडकलेल्या चौघांची नावे आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या चौघाची माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. NDRF ने सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार जीवितहानी झालेल्या मध्ये सोलापूरच्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश नसल्याचे सांगितलं. चौघा तरुणांच्या शोधासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
नांदेडचे 11 पर्यटक उत्तरकाशी येथील खराडी गावात सुरक्षित
नांदेडचे 11 पर्यटक उत्तरकाशी येथील खराडी गावात सुरक्षित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्क कार्यालयाने पर्यटकांशी संवाद साधला आहे. तसेच नांदेड जिल्हा प्रशासन 11 प्रवाशांच्या संपर्कात आहे. काल दुरावलेले पर्यटक आज एकत्र आले. कोणीही काळजी करू नये, आम्ही सुखरूप आहोत अशी माहिती सचिन पत्तेवार यांनी दिली.