
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मालवण नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. वैभव नाईक यांनी शिंदे गटाच्या धोरणांवर सडकून टीका करत मालवणच्या जनतेला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
माजी आमदार वैभव नाईक यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत पुरावा दिला आहे. त्यासोबतच त्यांनी काही सविस्तर माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवण दौऱ्यावर पैशांच्या बॅगा घेऊन आले होते, असा दावा वैभव नाईक यांनी केला आहे.
एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले. परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले. तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत. हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत, असा गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे, असाही आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे.
दरम्यान निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपने पैसे वाटल्याचा आरोप करत एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली होती. तसेच निलेश राणे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून २५ लाखांची रोकड जप्त केल्याचा दावा केला होता. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक यांनी राणेंच्या शिंदे-सेनेवर थेट पैसे वाटपाचा आरोप केला आहे.