त्याचा साखरपुडा अन् तिचा ‘तो’ कॉल…हगवणेंच्या वकिलाचा खळबळजनक दावा, वैष्णवीच्या मृत्यूची नवी थिअरी!

वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूची नवी थेअरी हगवणे कुटुंबाच्या वकिलाने समोर आणली आहे. त्यामुळे आता नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

त्याचा साखरपुडा अन् तिचा तो कॉल...हगवणेंच्या वकिलाचा खळबळजनक दावा, वैष्णवीच्या मृत्यूची नवी थिअरी!
| Updated on: May 28, 2025 | 7:02 PM

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची धग अजूनही संपलेली नाही. या प्रकरणात संपूर्ण हगवणे कुटंब आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले असून न्यायाधीशांनी हगवणे कुंटब तसेच वैष्णवी हगवणेच्या कुटुंबीयांची बाजू ऐकून घेतली. दरम्यान, हगवणे कुटुंबाने वैष्णवीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. हगवणेंच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात वैष्णवीच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केलीय. हगवणेंनी वकिलांमार्फत वैष्णवीच्या मृत्यूची एक नवी थिअरीच समोर आणली आहे.

18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा

सध्या कोठडीत असलेल्या हगवणे कुटुंबाची बाजू अॅड. विपुल दुशिंग यांनी मांडली. त्यांनी आपल्या युक्तिवादामध्ये वैष्णवीचे अन्य पुरुषाशी संबंध होते, असा दावा केला. त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता. त्यासाठी ती कॉल करत होती. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीला नकार दिला असेल, म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल, अशी नवी थिअरी हवगणे कुटुंबाचे वकील अॅड. दुशिंग यांनी मांडली.

तिची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती

तसेच, वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती. तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तिने उंदीर मारण्याचं औषध घेतलं होतं. तर एकदा तिने गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा युक्तीवाद दुशिंग यांनी केला.

हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या

तसेच, नवऱ्यानं बोयकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत. ते कुटुंब 40 लाखांच्या फॉर्च्यूनरसाठी छळ करेल का? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले. तसेच हगवणे कुटुंबाचं सोनं हे घरच्या व्यवसायासाठी गहाण ठेवण्यात आलंय. सोन्याच्या दागिन्यांविषयी चुकीचं सोंगितलं जातंय. निलेश चव्हाण हा आरोपी नाही. त्याने बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं, असाही युक्तिवाद हगवणेंच्या कुटुंबीयांनी केला. या युक्तीवादाला खोडून काढण्यासाठी सरकारी वकील नितीन अडगळे यांनी बाजू मांडली. वैष्णवीचं काही चॅटिंग असेल तर ते न्यायालयात का सादर केलं नाही? असा प्रश्न अडगळे यांनी उपस्थित केला.

तसेच, वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्या आहेत त्याचाही तपास करायचा आहे. आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे. त्या मोबाईलमध्ये व्हिडीओ असू शकतात. हुंड्यामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं का गहाण ठेवलं, याचीही माहिती घ्यायची आहे, असेही अडगळे यांनी न्यायालयाला सांगितले.

हगवणे कुटुंबीयांना कोठडी

दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीचा दीर आणि सासरा यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी आणि वैष्णीची सासू, नवरा आणि नणंद यांना एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.