हगवणे कुटुंबाचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर, शशांक हगवणेच्या अडचणी वाढल्या

वैष्णवी हगवणे प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे, आणखी एक प्रकरण समोर आलं असून, यामुळे आता शशांक हगवणे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हगवणे कुटुंबाचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर, शशांक हगवणेच्या अडचणी वाढल्या
| Updated on: Jun 05, 2025 | 8:55 AM

गेल्या महिन्यामध्ये पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती, या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली. वैष्णवी हगवणे या विवाहीत तरुणीनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे, दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवी हगवणे हिचा पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली. दरम्यान या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

हगवणे कुटुंबाचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे, यामुळे आता वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रशांत येळवंडे यांनी शशांक हगवणे विरोधात फसवणुकीची तक्रार केली होती, जेसीबीच्या व्यवहारामध्ये आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. शशांक हगवणे याने बँकेचे हाफ्ते भरले नाही म्हणून बँकेनं जेसीबी जप्त केल्याचा दावा देखील केला जात होता. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी संबंधित बँकेची देखील चौकशी केली आहे. महाळुंगे पोलिसांनी या प्रकरणात संबंधित बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला चौकशीसाठी बोलावलं होतं. या दरम्यान बँकेकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे, तक्रारदार प्रशांत येळवंडेंचा जेसीबी आम्ही जप्त केला नाही, अशी माहिती बँकेकडून पोलिसांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.  आता हा जेसीबी कोणी जप्त केला याची माहिती  आज पोलीस शशांक हगवणेकडून घेणार आहेत. ज्यांनी हा जेसीबी जप्त केला त्याला सुद्धा पोलीस या फसवणुकीच्या प्रकरणात सह आरोपी करणार आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण? 

25 लाख रुपयांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला होता.  त्यानुसार प्रशांत एळवंडे यांनी सुरुवातीला 5 लाख रुपये शशांक याला दिले. बँकेचे हफ्ते भरण्यासाठी दरमहा 50 हजार रुपये शशांकला ते  देत होते.  मात्र शशांक याने हाफ्ता न भरल्यानं बँकेनं जेसीबी जप्त केल्याचा दावा करण्यात येत होता, त्यानंतर शशांक याने तो जेसीबी पुन्हा सोडून आणला, मात्र प्रशांत यांनी दिलेले पैसे परत केले नाहीत, या प्रकरणात आपली 11 लाख 70 हजारांची फसवणूक झाल्याचा आरोप एळवंडे यांनी केला आहे, मात्र आता आम्ही जेसीबी जप्त केलाच नव्हता असा खुलासा संबंधित बँकेकडून करण्यात आला आहे.