‘वाल्मिक कराडच मास्टरमाईंड’, …तर आडवा करा नेमका काय होता तो निरोप? वाचा संतोष देशमुख हत्याकांडातील A टू Z घटनाक्रम

वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मास्टरमाईंड असल्याचं सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आलं आहे. जाणून घेऊयात संपूर्ण घटनाक्रम

वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, ...तर आडवा करा नेमका काय होता तो निरोप? वाचा संतोष देशमुख हत्याकांडातील A टू Z घटनाक्रम
| Updated on: Mar 01, 2025 | 5:06 PM

वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मास्टरमाईंड असल्याचं सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आलं आहे. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी अडथळा आणल्यामुळे त्यांची हत्या, करण्यात आली, असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. जाणून घेऊयात संपूर्ण घटनाक्रम.

8 ऑक्टोबर 2024 ला अवदा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंना कराडनं परळीच्या कार्यालयात बोलावलं, कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी द्या, अन्यथा अवदा कंपनीची बीड जिल्ह्यातील कामं बंद करा अशी धमकी कराडं विष्णू चाटेच्या समोर थोपटेंना  दिली.

29 नोव्हेंबरला कराडनं चाटेच्या फोनवरून अवादा कंपनीच्या सुनील शिंदेंना काम बंद करण्याची पुन्हा धमकी दिली. त्याच दिवशी सुदर्शन घुलेनं कंपनीत जाऊन धमकी दिली.

29 नोव्हेंबरलाच कराड, चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधील सांगळे आणि कृष्णा आंधळेनं केजच्या कार्यालयात मिटिंग घेऊन कट रचला

6 डिसेंबर 2024 ला घुले आणि सांगळेनं कंपनीत जाऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण केली.
दोन कोटी द्या, नाहीतर कामं बंद करा अशी धमकी दिली.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मस्साजोगचे सरपंच देशमुखांना फोन केला, देशमुखांनी घुलेला कंपनी बंद करू नकोस लोकांना रोजगार मिळू द्या, अशी विनंती केली. सुदर्शन घुलेनं त्यावेळी देशमुखांना सरपंच तुला बघून घेऊ, जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

त्यानंतर विष्णू चाटे, देशमुखांना वारंवार खंडणीच्या आड येऊ नको, वाल्मिक अण्णा तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता.

सात डिसेंबर 2024 ला सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन केला, कराडनं घुलेला सांगितलं, जो तो उठेल आपल्या आड येईल, आपण भिकेला लागू, कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. त्यामुळे जो कुणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल, कामाला लागा, विष्णू चाटेशी बोला तो तुम्हाला मदत करेल.

आठ डिसेंबरल 2024 ला चाटे घुले आणि अन्य चांदुर फाट्याजवळील हॉटेल तिरंगा इथं भेटले, त्यावेळी घुलेनं कराडचा निरोप दिला. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतात, हा संदेश इतरांना जाऊ द्या, असा निरोप दिला.

9 डिसेंबरला दुपारी तीन वाजून 22 मिनिटांनी आरोपींनी संतोष देशमुख यांची गाडी अडवून अपहरण केलं. त्यानंतर लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर आणि काठीने संतोष देशमुख यांचा मारहाण करत त्यांचा खून केला.