आता तू माझी पत्नी आहेस… मुंबईच्या शाळकरी मुलीसोबत जीवदानी गडावर भयंकर घडलं

वसई-विरारमध्ये एका शाळकरी मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारच्या जीवदानी मंदिरात बनावट लग्न करून अत्याचार करणाऱ्या आरोपीवर नायगाव पोलिसांनी पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आता तू माझी पत्नी आहेस... मुंबईच्या शाळकरी मुलीसोबत जीवदानी गडावर भयंकर घडलं
marriage
| Updated on: Jan 19, 2026 | 9:56 AM

शाळकरी मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना वसई-विरार परिसरात घडली आहे. विरारच्या प्रसिद्ध जीवदानी मंदिरात नेऊन गळ्यात मंगळसूत्र बांधून आपले लग्न झाले आहे असा बनाव आरोपीने रचला. त्यानंतर त्या आरोपीने पीडितेवर अत्याचार केले. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मुंबईची रहिवासी असून ती शालेय शिक्षण घेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख एका सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणाशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यानंतर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेचे वय कमी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिला विरार येथील जीवदानी गडावर नेले. त्यानंतर त्याने तिथे तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि मग त्यानंतर समाजमान्य पद्धतीने लग्न केल्याचा बनाव रचला. यानंतर त्याने आपण पती-पत्नी आहोत असे सांगत वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.

यानंतर १७ जानेवारी रोजी पीडित मुलगी शाळेत जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. ती वसई रेल्वे स्थानकावर आरोपीला भेटण्यासाठी आली होती. मात्र, स्थानकावर वावरताना तिचा वावर संशयास्पद वाटला. त्यामुळे सतर्क रेल्वे पोलिसांनी तिची विचारपूस केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर खरी माहिती समोर आली. यानंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला त्यांच्या स्वाधीन केले.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

घरी परतल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पालकांनी याप्रकरणी नायगाव पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक करत असून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे.

दरम्यान या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा आणि सोशल मीडिया किंवा अनोळखी व्यक्तींशी होणाऱ्या मैत्रीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुलांच्या वागण्यातील बदलांकडे पालकांनी सतर्कतेने लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच, अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुलांनी तातडीने संवाद साधला पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करुन कठोर शिक्षा करावी, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.