
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने (बविआ) आपला गड पुन्हा एकदा भक्कमपणे राखला आहे. सर्व विरोधकांना धूळ चारत बविआने ११५ पैकी तब्बल ७१ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने ४४ जागा जिंकून मोठी मुसंडी मारली आहे. मात्र सत्तेचे समीकरण जुळवण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे त्यांना प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत समाधान मानावे लागणार आहे.
वसई विरार महापालिकेच्या निकालाच्या सुरुवातीपासूनच बहुजन विकास आघाडीने आघाडी घेतली होती. प्रभाग क्रमांक १, ३, ४, ७, ८, ९ आणि १२ सह अनेक प्रभागांमधील चारच्या पॅनेलने विजय मिळवत ७१ उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. या निवडणुकीत भाजपाने कडवी झुंज देत ४४ जागा जिंकल्या. तर शिवसेना शिंदे गटाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या प्रमुख पक्षांना आपले खातेही उघडता आले नाही.
Maharashtra Municipal Election Results 2026 : राज्यातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट पहिली प्रतिक्रिया...
Maharashtra Election Results 2026 : 17 पैकी 16व्या प्रभागात तीनही जागा काँग्रेसला
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
मुरलीधर मोहोळ निकाल येताच अजितदादांवर बरसले, पहिली प्रतिक्रिया काय?
या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. हा विजय केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मिळाला आहे. विरोधकांनी परराज्यातून आणि बाहेरून अनेक मोठे नेते प्रचारासाठी आणले, पण त्यांच्या नेत्यांसमोर माझे निष्ठावान कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहिले. ‘दीवार’ चित्रपटात एक संवाद होता की ‘मेरे पास मां है’, तसंच मी अभिमानाने सांगतो की ‘मेरे पास कार्यकर्ता है’. आम्ही केवळ निवडणुका लढवण्यासाठी नाही, तर काम करण्यासाठी कर्तृत्वान उमेदवार दिले होते. अगदी जनरल जागेवर आदिवासी महिलेला संधी देऊन तिला निवडून आणण्याचे धाडस आम्ही दाखवले, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.
गेल्या ३५ वर्षांपासून निवडणुकीच्या काळात विरोधकांना फक्त माझी गुंडागर्दी आणि दहशतवाद दिसतो. सध्या सर्व सरकारी यंत्रणा त्यांच्याच हातात आहेत, मग त्यांनी खुशाल चौकशी करावी. मशीन स्लो झाल्या नसत्या आणि मतदार यादीतील गोंधळ झाला नसता, तर आम्ही १०० पार गेलो असतो. या निकालामुळे मी आनंदी असलो तरी पूर्णपणे समाधानी नाही, कारण प्रशासकीय गोंधळामुळे आमच्या काही महत्त्वाच्या जागा गेल्या. मात्र, आता जनतेने जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू, असेही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले.