त्याच्या नोकरीचा पहिलाच दिवस होता…आम्हाला न्याय मिळेल असे वाटत नाही, बॉम्बस्फोटात मुलगा गमावलेल्या पित्याची व्यथा

11 जुलै 2006 च्या साखळी बॉम्ब स्फोटात वसईच्या यशवंत भालेरव यांचा मुलगा हर्षल भालेराव दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज न्यायालयाने सर्व आरोपीना निर्दोष मुक्तता केल्यानंतर हर्षलचे वडील यशवंत भालेराव यांनी चिंता व्यक्त करीत. संपूर्ण सिस्टीमला या प्रकरणी दोषी मानले आहे.

त्याच्या नोकरीचा पहिलाच दिवस होता...आम्हाला न्याय मिळेल असे वाटत नाही, बॉम्बस्फोटात मुलगा गमावलेल्या पित्याची व्यथा
| Updated on: Jul 21, 2025 | 7:06 PM

माझा मुलगा 23 वर्षांचा होता. अकाऊंटन्ट झाल्यानंतर सॉफ्टवेअर कंपनीत लागला होता. त्याचा कामाचा तो पहिलाच दिवस होता. ब्लास्टच्या दिवशी माझा हर्षल हा बोरिवलीच्या गाडीत होता आणि मी भाईंदरच्या गाडीत होतो, दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ब्लास्ट झाला होता, मी त्याचा साक्षीदार आहे.त्यावेळी मी 56 वर्षांचा होतो आणि भाईंदरपासून मी वसईपर्यंत चालत आलो होतो. घरी आलो तर कळाले की हर्षल घरी आलेला नाही, आम्ही त्याला दोन दिवस खप शोधले…खूप त्रास झाला त्याला शोधताना हर्षल भालेरावचे वडिल यशवंत भालेराव यांच्या डोळ्यासमोर तो दिवस आजही तरळत आहे.

आज न्यायालयाने २००६ च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपीना निर्दोष मुक्त केल्यानंतर हर्षलचे वडील यशवंत भालेराव यांनी चिंता व्यक्त करीत संपूर्ण यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत.न्यायालयाचा निकाल हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे न्याय मिळाला की नाही हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे किती विश्वास ठेवावा या न्याय व्यवस्थेवर हे आम्हालाच कळत नाही असे उद्वीग्न प्रतिक्रीया त्यांनी टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याशी बोलताना दिली आहे.

न्यायाची अपेक्षा आम्हाला कधीच वाटली नाही

ते पुढे म्हणाले की, माझ्या घरात मी माझी पत्नी आहेत, मी आता 76 वर्षांचा आहे. मला एक मुलगा आणि एकच मुलगी होती. आणि साखळी बॉम्बस्फोटात माझा हातातोंडाशी आलेला मुलगा हर्षल गेला. या घटनेनंतर आम्हाला एक वर्षापर्यंत वाटत होते की हे जे अतिरेकी लोक आहेत, ज्यांना सरकार पकडलंय आणि त्यांना सजा होईल. पण तसे झालं नाही, त्यांना फार उशीरा पकडले गेले. ते खरंच आरोपी पकडले गेले होते की फक्त दाखविण्यासाठी पकडले गेले हे आम्हाला अजूनही कळत नाही. त्यानंतर 26/ 11 चा हल्ला झाला आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले गेले.आम्हाला 15 वर्षापर्यंत कळलं नाही की काय करतंय हे सरकार. त्यामुळे न्यायाची अपेक्षा आम्हाला कधीच वाटली नाही मीही सरकारमध्ये होतो. मला सुरवातीपासूनच वाटत होते की सरकार कडून न्याय मिळणार नाही असे हताश उद्गगार भालेराव यांनी काढले आहेत.

ही संपूर्ण सिस्टीमच दोषी

जे आरोपी निर्दोष सुटले ते आरोपी होते का ? हाच पहिला प्रश्न आहे. कारण जे आरोपी पकडले ते निश्चितच आरोपी नव्हते असंच या निकालावरून स्पष्ट होत आहे. त्यावेळी जो जनक्षोभ होता, त्याला शांत करण्यासाठी हे आरोपी पकडले असल्याचा आमचा आरोप आहे. हे सरकार सुप्रीम कोर्टात जातील की नाही, यावरच आमचा विश्वास नाही, आणि ते आरोपी ही आहेत की नाही हेही माहीत नाही. आता माझे वय 76 आहे, आता कसली न्यायाची अपेक्षा करायची. मी या सिस्टीमलाच दोष देत आहे असेही भालेराव यांनी सांगितले.

ते दहा लाख समाजाला दिले

आम्ही जे घर बांधले ते घर हर्षलच्या आग्राहा खातरच बांधले होते. घर बांधल्यानंतर 11 महिन्यांनी ही दुर्दैवी घटना घडली. म्हणून त्याच्या आठवणीसाठी आम्ही घराला  ‘7/11 हर्षल स्मृती’  असे नाव दिले आहे. त्याच्या मृत्यूनंतर मला जे 10 लाख रुपये मिळाले होते, ते 10 लक्ष रुपये सुद्धा मी समाजाला दिले आहेत. त्या पैशातून बौद्ध समाज मंदिर बांधून त्याला हर्षल बौद्ध समाज मंदिर नाव दिले आहे. आजही त्याच्या आठवणी आमच्या सोबत आहेत असे भालेराव यांनी सांगितले.