
राज्यात काही ठिकाणी मंगळवारी नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मतदान सुरू असताना काही ठिकाणी राडा झाल्याच्या घटना देखील समोर आल्या, दरम्यान गेवराईमधून मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे गेवराईत मतदान सुरू असतानाच जोरदार राडा झाला आहे, दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाणीची घटना घडली आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे पीए अमृत डावखर यांना बेदम मारहाण करण्यात आली, सध्या त्यांच्यावर बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, दरम्यान हा हल्ला माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे उर्फ त्रिंबक पवार यांनी केल्याचा आरोप अमृत डावखर यांनी केला आहे, अमरसिंह पंडित यांना मारण्याचा कट होता असा थेट आरोप अमृत डावखर यांनी केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान डावखर यांच्या प्रतिक्रियेनंतर आता आमदार विजयसिंह पंडित यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले विजयसिंह पंडित?
काल नगरपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असताना, गेवराईत दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाणीची घटना घडली होती. या दरम्यान पंडित यांच्या कृष्णाई या कार्यालयावर आठ ते दहा लोकांनी हल्ला करत अमरसिंह पंडित यांचे पीए डावखर यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणावर बोलताना विजयसिंह पंडित यांनी बाळराजे पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अमरसिंह पंडित यांची कट रचून हत्या करण्याचं माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू त्रिंबक पवार यांचं षडयंत्र होतं असा थेट गंभीर आरोप विजयसिंह पंडित यांनी केला आहे. संघटित गुन्हेगारी करण्यात त्याचा हातखंडा आहे. हा सुनियोजित कट होता, अमरसिंह पंडित अर्ध्या तासापूर्वी तिथेच होते, असं विजयसिंह पंडित यांनी म्हटलं आहे. अमरसिंह पंडित यांना आज जिवच मारू, त्यांना आज सोडायचं नाही, असं यावेळी बाळराजे पवार म्हणत होते, अमरसिंह पंडित इथे नाही तर आता तुला मारतो म्हणून त्यांनी डावखर यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणात उद्या सकाळी आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहोत, या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहोत, असं यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितलं आहे.