श्री सदस्यांच्या मृत्यूवरून काँग्रेसची सर्वात मोठी मागणी; सुषमा अंधारेंनी मनसे, भाजपलाही खेचलं

| Updated on: Apr 19, 2023 | 6:29 PM

रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

श्री सदस्यांच्या मृत्यूवरून काँग्रेसची सर्वात मोठी मागणी; सुषमा अंधारेंनी मनसे, भाजपलाही खेचलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांच्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी श्री सदस्यांच्या मृत्यूचं प्रकरण शिंदे-फडणवीस (Shinde Fadanvis) सरकारसाठी मोठी अडचण निर्माण करणारं ठरलंय. श्री सदस्यांच्या मृत्यूवरून शिंदे सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी विरोधकांनी केली आहे. कार्यक्रम स्थळी योग्य नियोजन नसल्यानेच श्री सदस्यांचा मृत्यू ओढवला, असा ठपका काँग्रेस तसेच शिवसेनेने ठेवलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सरकारकडून यावर काहीही प्रतिक्रिया उमटत नसल्याने काँग्रेस आता सर्वात मोठी मागणी मांडण्याच्या तयारीत आहे. खारघर घटनेत एवढ्या लोकांचा मृत्यू झालाय. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विशेष अधिवेशनाची मागणी करणार आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

लोक उन्हात, मंत्री म्हणतात हे तेज…

विजय वडेट्टीवार टीव्ही9शी बोलताना म्हणाले, ‘एवढ्या उन्हात लोक बसले होते आणि मंत्री म्हणतात,  त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं लाज वाटली पाहिजे.. सरकारने योग्य नियोजन न केल्यामुळेच उष्माघाताने तसेच चेंगराचेंगरीमुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केलाय.

काय घडलं नेमकं?

रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर या कार्यक्रमासाठी लाखो श्री सदस्यांची गर्दी जमली होती. भर उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाला. यात १३ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूंसाठी सरकारचं गैरव्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर मृतांचा आकडा यापेक्षा जास्त आहे, असाही आरोप विरोधक करत आहेत.

सुषमा अंधारेंनी मनसे, भाजपलाही खेचलं…

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मनसे आणि भाजपवरही आक्रमक टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना थोडं खरचटलं तर भाजप नेते धावून आले. देशपांडे काही तासातच एका पार्टीत नाचू लागले. देशपांडेच्या जीवाला एवढी किंमत आहे तर श्री सदस्यांचा जीव भाजपच्या लेखी कस्पटासमान आहे का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियातील पोस्टद्वारे केलाय.