असंख्य आरोपांनी घेरलं… बालाजी तांदळे अखेर मीडियासमोर; पहिली प्रतिक्रिया काय?

कोरेगावचे सरपंच बालाजी तांदळे यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. आता नवीन व्हिडीओमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. तांदळे यांनी पोलिसांना सहकार्य केल्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे आणि धनंजय देशमुख यांच्या आरोपांना खोटे ठरवले आहे. त्यांची गाडी पोलिसांनी वापरल्याबाबतची माहिती आणि प्रवासाचा तपशीलही त्यांनी दिला आहे.

असंख्य आरोपांनी घेरलं... बालाजी तांदळे अखेर मीडियासमोर; पहिली प्रतिक्रिया काय?
| Updated on: Feb 22, 2025 | 2:14 PM

ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड : संतोष देशमुख प्रकरणात आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात कोरेगावचे सरपंच बालाजी तांदळे ब्लँकेट खरेदी करताना दिसत आहे. तसेच या प्रकरणात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बालाजी तांदळे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यावर बालाजी तांदळे यांनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. बालाजी यांनी एका एका मुद्द्यावर त्यांचं मत मांडलं आहे. तसेच त्यांच्यावर झालेले आरोप कसे खोटे आहेत, याची माहितीही दिली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी तुमची गाडी वापरल्याचं सांगितलं जातं, असं जेव्हा बालाजी तांदळे यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 9 तारखेला घटना झाल्यानंतर रास्ता रोको झाला होता. पोलिसांच्या गाड्या इकडे येत नव्हत्या. त्या दिवशी मला LCB च्या अधिकाऱ्यांनी फोन केला. नेकनूरचे एपीआय गोसावी आणि भागवत शेलार आम्ही असे मिळून वाशीला गेलो. त्यानंतर भागवत शेलार यांना तांदळ्यामध्ये तीन आरोपी असल्याची टीप आली. त्यामुळे रात्री 3 वाजता आम्ही गेलो आणि आरोपींना पकडलं. नंतर आम्ही पुण्याला गेलो आणि वापस आलो, असं बालाजी तांदळे म्हणाले.

धनंजय देशमुख म्हणतात बालाजी तांदळेच्या दारात चार दिवस गाडी उभी होती. त्या आरोपीच्या पाठीमागे असलेली ती गाडी 10 तारखेला पोलिसांनी पोलीस स्टेशनला जप्त केली. आणि चार दिवस जी गाडी उभी होती, ती भागवत शेलार यांची गाडी होती. त्याची चौकशी करावी. त्यात चूक असेल तर मला आरोपी करावं, असं तांदळे म्हणाले.

मुंबईपासून कर्नाटकपर्यंत गाडी फिरली

गाडी कोणत्या जिल्ह्यात फिरली? किती दिवस फिरली? किती किलोमीटर फिरली? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी सविस्तर माहिती दिली. संपूर्ण प्रवास 10 हजार 300 किलोमीटर झाला. आम्ही कर्नाटकला दोन वेळेस गेलो. मुंबईला सात-आठ वेळेस गेलो. पुण्याला पाच सात वेळा गेलो. लातूर, जालना, औरंगाबाद अशा भरपूर ठिकाणी गेलो. मुंबईला ठाणे, भिवंडी, नवी मुंबई येथे गेलो. कर्नाटकमध्ये मुधोळ कारखाना आहे, तिथे सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळ्याच्या टोळ्या आहेत. तिथे गेलो पहिल्या वेळेस आम्ही तिथे सात दिवस मुक्काम केला, असंही तांदळे म्हणाले.

सगळ्यांनाच पकडलं

तुमच्या माध्यमातून पोलिसांना किती आरोपी सापडले? असंही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. सगळ्याच आरोपींना आपल्या गाडीत लिंक लावून आणलं आहे. त्यांचे जवळचे मित्र कोण वगैरे अशी लिंक लावली होती, असं त्यांनी सांगितलं.

ते पोलिसांनाच विचारा

पोलिसांनी तुमची गाडी का वापरली? असा सवाल करताच माझी गाडी का वापरली हे तुम्ही पोलीस प्रशासनालाच विचारा. तुम्ही मलाच का घेऊन चालला असं मी पोलिसांना कसं म्हणू शकतो. पोलीस म्हणाले, तुम्ही सोबत हवेत, त्यामुळे मीही गेलो. सहकार्य करणं चूक असेल तर सांगा. घटना एवढी मोठी झाली म्हणून आपण सहकार्य केलं. आपण आरोपी पळून लावले ती चूक झाली. आपण प्रशासनाला आरोपी पकडायला मदतही केली, असंही ते म्हणाले.

सध्या त्यांना गरज नाही

पोलीस तुमची आताही मदत घेतात का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या त्यांना काहीच गरज नाही. कृष्णा आंधळे सापडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.