
वंचितनं शिरुर लोकसभेत जाहीर केलेल्या उमेदवाराचं नाव रद्द केलं आहे. भाजपशी जवळीक असलेल्या व्यक्तीला वंचितनं तिकीट कसं दिलं., यावरुन विविध चर्चा सुरु होत्या, त्यात फडणवीसांशी झालेल्या भेटीनं त्या चर्चांना अजून बळ दिलं. त्यामुळे वंचितनं आता जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली आहे. शिरुर लोकसभेत जाहीर केलेली उमेदवारी वंचित आघाडीनं अखेर रद्द केलीये. शिरुरमधून मंगलदास बांदल यांना वंचितनं उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी जाहीर होण्याआधी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही मंगलदास बांदलांनी देवेंद्र फडणवीसांशी घेतलेल्या भेटी चर्चेत राहिल्या.
1 एप्रिलला मंगलदास बांदल पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या प्रचारात होते. त्याच्या 48 तासानंतर म्हणजे 3 एप्रिलला वंचितनं त्याच बांदलांना शिरुरमधून उमेदवारी दिल्यानं आश्चर्य व्यक्त झालं. दोन दिवसांनी म्हणजे 5 एप्रिलला बांदल इंदापुरात फडणवीसांना जावून भेटले. या भेटीनं पुन्हा वंचितच्या भूमिकेवर टीका झाल्यानंतर अखेर वंचितनं उमेदवारी रद्द केलीये.
काही वर्षांपूर्वी मंगलदास बांदल राष्ट्रवादीत होते. खंडणीच्या आरोपानंतर त्यांचं निलंबन झालं. काही काळ त्यांना तुरुंगावासही झाला. नंतर 2009 मध्ये त्यांनी भाजपकडून दिलीप वळसे पाटलांविरोधात आंबेगाव विधानसभा लढवली. या घडीला ते कोणत्याही पक्षात नव्हते
मात्र भाजपसोबत त्यांची जवळीक वाढली होती.
वंचितचे उमेदवार भाजपच ठरवत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला होता, त्यात मंगलदास बादलांना मिळालेल्या तिकीटनं
सोशल मीडियात टिकांचे पडसाद उमटू लागले. गेल्या काही दिवसात बांदलाची विधानं आणि भेटीगाठींचा सिलसिलाही रंजक राहिला.
बदलावे लागलेले उमेदवार आणि भूमिकांमुळे यंदा वंचित आघाडीत नेमकं चाललंय तरी काय. असे प्रश्न विचारले जावू लागलेत. मविआसोबत चर्चा करताना वंचितनं पुण्यातून अभिजीत वैद्यांना तिकीट देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी मनसे सोडलेल्या वसंत मोरेंना वंचितनं तिकीट दिलं. 23 फेब्रुवारीला आंबेडकरांनी म्हटलं की आम्ही मविआला चारही पक्षांनी प्रत्येकी 12 जागांचा फॉर्म्युला सांगितला आहे. 29 फेब्रुवारीला वंचितचे उपाध्यक्ष म्हणाले की मविआ बैठकीत आम्ही 27 जागांची मागणी केली. नंतर वंचितनंच ही मागणी नव्हे तर प्रस्ताव होता., 27 जागांवर आम्ही तयारी केलीये असं सांगितलं.
2 एप्रिलला वंचितनं परभणीतून बाबासाहेब उगलेंना उमेदवारी जाहीर केली. 4 एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उगलेंची उमेदवारी रद्द करुन पंजाब डक यांचा फॉर्म भरला. 2019 ला परभणीत वंचितचे आलमगीर खान उमेदवार होते, त्यांनी दीड लाख मतं घेतली होती
पण यंदा वंचितनं तिकीट न दिल्यानं त्यांनी राजीनामा देत बसपाकडून उमेदवारी मिळवली.
27 मार्चला यवतमाळमध्ये वंचितनं सुभाष पवारांना तिकीट दिलं, मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारी बदलून अभिजीत राठोडांचा फॉर्म भरला. पण छाननीवेळीच तांत्रिक त्रुटींमुळे राठोडांचाही अर्ज बाद झाला.
अमरावतीत वंचितनं प्राजक्ता पिल्लेवानांना उमेदवारी जाहीर केली. नंतर रिपब्लिक सेनेच्या आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा दिल्याचं पत्रक काढलं. मात्र स्थानिक पातळीवर वंचितनंच समर्थकांना रॅलीत जावू नका म्हणून आदेश दिल्याचा आरोप आनंदराज आंबेडकरांनी केला.
यावरुन मतविभागणी नको म्हणत आनंदराज आंबेडकरांनीही अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला.
रामटेकमध्ये वंचितनं भाजप बंडखोर शंकर चहांदे आणि काँग्रेस बंडखोर किशोर गजभिये दोघांनाही एबी फॉर्म दिला. मात्र चहांदेंनी कौटुंबिक कारण सांगत गजभियेंना पाठिंबा जाहीर केला. पण अर्जमाघारीची तारीख उलटून गेल्यानं आता वंचितनं पाठिंबा दिलेले एक, माघार घेतलेले वंचितचे अधिकृत उमेदवार एक. अशा दोन्ही उमेदवारांची नाव ईव्हीएम मशीनवर असणार आहेत. आता अधिकृत उमेदवाराऐवजी पाठिंबा
दिलेल्या उमेदवारासाठी वंचितनं मतदानाचं आवाहन केलं आहे.
इतके घोळ का झाले यावरुन आधीच वंचितच्या भूमिकांवर टीका होतेय., त्यामुळेच शिरुरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केल्याचं बोललं जातंय.