वाल्मिक कराडच्या मुलाच्या अडचणीत वाढ, थेट मुलावरच…. Walmik karad Son
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. घरास घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापुरातून वाल्मिक कराडच्या मुलाचं धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, पोक्सो कलम, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 14 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलावर गुन्हा झाल्याने तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचं टेन्शन आणखी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडची दादागिरी देखील समोर येऊ लागल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्याविरोधात गंभीर गुन्ह्याचा आरोप होता. मॅनेजरच्या घरात घुसून त्याला आणि मुलीला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप होता. त्यानंतर आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहराच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा संपूर्ण प्रकार आहे.
सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवर या तिघांवर हा गुन्हा दाखल केला आहे. सुशील कराड आणि त्याच्या साथीदाराने पीडित महिला आणि तिच्या पतीसह मुलीला घरात घुसून धमकी देत मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या नावावरील प्लॉट, सोने धमकी देऊन स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय पीडितेच्या दोन 6 वाहने देखील स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आलेय. हा सर्व प्रकार 2024 साली घडला होता. पीडितेने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतलाय. दोन वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर सुशील कराडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर सोलापूर पोलिसांनी पुढाकार घेऊन सुशील कराडच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. यामुळे वाल्मिक कराडसह सुशील कराडच्या अडचणीत वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.