रामलिला मैदानावरील महाआंदोलनाने व्यापारी धास्तावले, थेट जोडले राहुल गांधींना हात, घडलं काय?
CTI Letter to Rahul Gandhi: "राजकीय बाजारात प्रेमाचं दुकान बंद झाली" असे म्हणत दिल्लीतील व्यापाऱ्यांनी पुन्हा काँग्रेस खासदार आणि नेते राहुल गांधी यांना हात जोडले. ऐन दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या आंदोलनाने व्यापारी धास्तावले आहेत.

CTI Letter to Rahul Gandhi: सर्वात मोठा सण दिवाळी ऐन तोंडावर आलेली असताना दिल्लीतील व्यापारी घाबरले आहेत. राजकीय बाजारात प्रेमाचं दुकान बंद करण्याची वेळ येणार असल्याचा त्यांचा दावा आहे. दिल्लीतील जंतरमंतरऐवजी आता रामलिला मैदानावर आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. रामलिला मैदानावर दिवाळीच्या अगोदर खरेदीसाठी दुकानं थाटली जातात. पण उद्या 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून महाआंदोलन करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांची शिखर संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजने(CTI) वर्तवली आहे. तर काँग्रेसच्या गोटातून सरकारच्या एका घोडचुकीमुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारने जंतरमंतरवर आंदोलनाचे ठिकाण कायम ठेवणे आवश्यक होते असे सांगितले जात आहे.
आमची दुकानं बंद करू नका
व्यापाऱ्यांची शिखर संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजने(CTI) यापूर्वी सुद्धा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यांनी त्यात हे आंदोलन दिवाळीत न करण्याचे आवाहन केले होते. तर आता उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमची दुकानं बंद करू नका अशी भावनिक साद व्यापाऱ्यांनी घातली आहे. हे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा केली आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे काय?
CIT चे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी संघटनेची भूमिका मांडली. राहुल गांधी हे त्यांच्या भारत जोडो यात्रेत आणि भाषणांमध्ये द्वेष सोडा आणि प्रेमाचं दुकान उघाडा असे सांगत होते. त्यांनी वारंवार ही घोषणा दिली. चांदणी चौक ते पराठवाली गल्ली, खारी बावलीचे मसाले, सदर बाजाराची उत्पादने, करोलबागची प्रसिद्ध दुकाने ही आमची 300 वर्षांची जुनी मोहब्बतची दुकानं आहेत. ती ग्राहक आणि व्यापाऱ्यांमधील विश्वासावर चालतात, असे गोयल म्हणाले.
पण धनत्रोयदशी आणि दिवाळी तोंडावर आलेली असताना रामलीला मैदानावर आयोजित करण्यात येत असलेल्या या महामोर्चात 10 लाखांची गर्दी आणि 20 हजार वाहनं येण्याची शक्यता आहे. यामुळे चांदणी चौक, सदर बाजार, खारी बावली, चावडी बाजार, कॅनॉट प्लेस सारख्या 20 मोठ्या घाऊक बाजारावर परिणाम होऊन ते ठप्प पडतील अशी भीती सीआयटीने व्यक्त केली आहे.
10 हजार कोटींचा फटका, 75 लाख जणांच्या रोजगारावर परिणाम
त्यात रामलीला मैदानाच्या 5 किमी परिसरात दिल्लीतील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध होलसेल आणि किरकोळ बाजार आहे. यामध्ये चांदणी चौक, सदर बाजार, चावडी बाजार, भागीरथ पॅलेस, खारी बावली, कश्मिरी गेट, नया बाजार, मोरी गेट, किनारी बाजार, दरीबा, दरिया गंज, अजमेरी गेट, जामा मशिद, झंडेवालान, करोल बाग, नबी करीम, आझाद मार्केट आणि लजपत राय मार्केटचा समावेश आहे. या ठिकाणाहून संपूर्ण भारतात माल पाठवला जातो. आता अजून आंदोलन झाल्यास नुकसानीचा आकडा दहा हजार कोटींच्या घरात जाण्याचा दावा गोयल यांनी केला. तर यामुळे साधारणपणे 75 लाख जणांच्या रोजगारावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
