
राज्यातील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिकेसह सर्व महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीनतंरही अद्याप सत्ताधारी पक्षातील इनकमिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या वारजूरकर कुटुंबाने अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजूरकर यांनी बुधवारी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी याबाबतचे एक पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष यांच्याकडे पाठविला आहे.
डॉ. अविनाश वारजूरकर आणि डॉ. सतीश वारजूरकर या दोन्ही नेत्यांनी आपल्या राजीनामा पत्रात काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तिखट शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या पत्रात त्यांनी पक्ष सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. पक्षात अंतर्गत गटबाजी शिगेला पोहोचली असून, यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. काँग्रेस पक्षाचा वापर काही लोकांकडून स्वतःच्या धंद्यासाठी केला जात आहे, असा खळबळजनक आरोप वारजूरकर बंधूंनी केला आहे. तसेच याबद्दल वारंवार तक्रारी करूनही पक्षश्रेष्ठींकडून या बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही राजीनामा देत आहोत, असे वारजूरकर बंधूनी नमूद केले आहे.
विशेष बाब म्हणजे राजीनामा देण्याच्या २४ तास आधी वारजूरकर बंधूंनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. विशेष म्हणजे, ज्या बंटी भांगडिया यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सतीश वारजूरकर यांचा पराभव केला होता. त्याच आमदार भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. या भेटीमुळे वारजूरकर बंधू लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वारजूरकर कुटुंबाचे विदर्भातील राजकारणात मोठे प्रस्थ आहे. डॉ. अविनाश वारजूरकर हे केवळ माजी आमदारच नाहीत, तर त्यांनी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. तर डॉ. सतीश वारजूरकर हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, गटनेता आणि गिरगाव-वाढोणा क्षेत्राचे सदस्य म्हणून कार्यरत होते. नागभीड आणि चिमूर तालुक्यात या दोन्ही भावंडांची मोठी जनशक्ती आहे. आता दोन दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडल्याने चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची स्थिती कमकुवत होण्याची शक्यता आहे.