
राज्यातील आरोग्यव्यवस्थेचे याआधीही अनेकवेळा धिंडवडे निघालेले आहेत. शासकीय रुग्णालयात हलगर्जीपणामुळे अनेक रुग्णांचा जीव गेल्याची अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आलेली आहेत. अपुरे मनुष्यबळ, जुने आणि बिनकामची यंत्रं अशा परिस्थितीत अनेक शासकीय रुग्णालयांत रुग्णांवर उपचार केला जातो. कधीकधी मात्र रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांकडून मोठ्या चुका होतानाचेही प्रकार समोर आले आहेत. असे असतानाच आता वाशिम जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे . येथे एका रुग्णावर शस्त्रक्रिया करताना त्याची त्वचा थेट भाजली आहे. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
वाशिम जिल्हा रुग्णालयात अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेवेळी रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार घडल्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांना याची कोणतीही सूचना दिली नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात वाशिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शिरपूर येथील अताऊल्ला खान यांना पोटात दुखत असल्याने त्यांनी खासगी दवाखान्यात सोनोग्राफी केली होती. पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 19 मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले, तेव्हा त्यांनी तत्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली. तेव्हा डॉक्टरांनी या घटनेमागे “तांत्रिक बिघाड” असल्याचे सांगत ती अनावधानाने घडल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या संदर्भात डॉक्टरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी या सगळ्यावर बोलण्यास नकार दिला आहे. रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
तर दुसरीकडे पोलिसांनी रुग्णाच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील कार्यपद्धती, तांत्रिक उपकरणांची स्थिती आणि शस्त्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.