
वाशिम जिल्ह्यातील एका भाजीपाला विक्रेत्या कुटुंबाच्या सात वर्षांच्या मुलीला गंभीर यकृत विकारातून जीवनदान मिळाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वरुड येथील देवांशी रवींद्र गावंडे हिच्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील वाडिया रुग्णालयात ही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, देवांशीला तिच्या आईनेच यकृत दान केले. सध्या आई-मुलगी दोघीही सुखरूप असून त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे.
वरुड गावातील रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची सात वर्षांची मुलगी देवांशीला गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पोटदुखी, ताप आणि मळमळ अशा गंभीर समस्या जाणवत होत्या. सुरुवातीला मंगरुळपीर आणि अकोला येथे उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिला नागपूर आणि नंतर मुंबईतील वाडिया रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर तिच्या वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. यात डॉक्टरांनी देवांशीचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. यानंतर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.
या यकृत प्रत्यारोपणासाठी सुमारे २० लाख रुपयांचा मोठा खर्च होता. भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या गावंडे कुटुंबासाठी हा खर्च आवाक्याबाहेरचा होता, त्यामुळे कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले. याच वेळी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. या दोन संस्थांनी मोठा आर्थिक भार उचलल्यानंतर उर्वरित रक्कम सामाजिक संस्था आणि गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून जमा केली.
या बिकट परिस्थितीत देवांशीची आई मीनाक्षी गावंडे यांनी आपल्या मुलीला जीवनदान देण्यासाठी स्वतः यकृत दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुंबईतील बाई जेराबाई वाडिया रुग्णालयात ७ जुलै २०२५ रोजी ही गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यकृत प्रत्यारोपणानंतर देवांशीची प्रकृती आता स्थिर असून, तिच्या आरोग्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. देवांशीचे वडील रवींद्र गावंडे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्या मदतीमुळेच आपल्या मुलीचे प्राण वाचल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. “आम्ही आयुष्यभर त्यांचे ऋणी राहू,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
वाडीया हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा बेंदरे यांनी माहिती दिली की, अति जोखमीच्या आजारांवरही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये मोफत उपचार केले जातात. वाडिया हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. दरम्यान, वाशीम येथील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या डॉ. नयना सारडा यांनी गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष नेहमी तत्पर असतो, असे सांगितले. कमीतकमी कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयात भरती असतानाच आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.