
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा आज जळगावात मोठा नागरी सत्कार करण्यात आला. गुलाबराव पाटील यांची जळगावच्या पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. मंत्रिपद मिळाल्यानंतर तसेच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच गुलाबराव पाटील हे जळगावात आले. त्यानंतर त्यांचा जळगाव जिल्ह्यात भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला. जळगावातील आव्हाने ग्रामस्थांच्या वतीने भव्य पुष्पहार घालून शाल श्रीफळ देऊन गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच वाजत गाजत मिरवणूकही काढण्यात आली. जळगावातील कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथ मधील नगराध्यक्ष तथा मूळ आव्हाने येथील रहिवाशी सुनील चौधरी देखील उपस्थितीत होते.
जळगावातील आव्हाने ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सभारंभ पार पडल्यानंतर त्यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी त्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या निवडणुकीच्या म्हणजेच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या किस्सा सांगितला. विशेष म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांच्या विरोधात त्यांच्याच वडिलांचे मित्र हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते.
“मी पहिल्यांदा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभा राहिलो. पंचायत समितीच्या निवडणुकांच्या वेळी माझे वडील काँग्रेसचा प्रचार करत होते. मी 22 वर्षाचा असताना मला पंचायत समितीचे तिकीट मिळालं. मी तेव्हा 22 वर्षांचा होतो. माझ्यासमोर उभा राहिला तर मी तुला खूप मारीन असं माझे वडील त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर गावातल्या तरुण मुलांनी मला गायब केलं. मी दोन दिवस मी गायब होतो. माघारीच्या दिवशी सुद्धा मी गायब होतो आणि या निवडणुकीत मी निवडून आलो”, असा किस्सा गुलाबराव पाटील यांनी सांगितला.
“माझ्या विरोधात माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यांच्या घरी मी गेलो आणि पाया पडला. त्यांनी मला आशीर्वाद दिले. मी माझ्या वडिलांच्या पाया पडायला गेलो. जेव्हा मी गेलो त्यावेळी त्यांनी मला लाथ मारली. त्यानंतर मी 26 वर्षांचा असताना जिल्हाप्रमुख झालो. यानंतर 28 वर्ष वय असताना राज्यात सर्वात जास्त मतांनी जिल्हा परिषदेची निवडणुकीत निवडून आलो होतो. माझं वय 30 वर्ष 8 महिने असताना मी पहिल्यांदा आमदार झालो, त्यावेळी मी सर्वात गोरा होतो”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
“माझ्या समाजातील मी शेवटचा असेल. चार वेळा निवडून येणं आणि तीन वेळा कॅबिनेट मंत्रीपद यात मी पहिलाच असेल. गुलाबराव पाटील नाम का पिक्चर लास्ट, इसके बाद में होना नही है”, असेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटले.