Rohit Pawar: …तर विलिनीकरणाला काही हरकत नाही; रोहित पवारांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीसमोर ठेवली फक्त एकच अट, तटकरे-पटेलांना लगावला टोला

Rohit Pawar Sets Condition for NCP Merger: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit Pawar: ...तर विलिनीकरणाला काही हरकत नाही; रोहित पवारांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीसमोर ठेवली फक्त एकच अट, तटकरे-पटेलांना लगावला टोला
Rohit Pawar Breaks Silence on NCP Merger Talks
| Updated on: Nov 09, 2026 | 8:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात वेग आला आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. दिवाळीनिमित्त शरद पवारांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण आलो होतो. या भेटीत विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच त्यांनी यावर एक मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाबाबतही त्यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. तपास संथ गतीने सुरू आहे. सत्ताधारी योग्य दिशेने तपास करत नसल्याचा संशय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, मी दुष्काळ दौऱ्यासाठी महाराष्ट्रातील जवळपास 10 ते 11 जिल्ह्यांमध्ये जाऊन आलो. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्येही शरद पवारांची भेट घेतली होती.

Loading...

आज दिवाळीनिमित्त त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. आमच्यात वैयक्तिक, आरोग्यविषयक आणि दुष्काळाच्या परिस्थितीबाबत चर्चा झाली. त्याव्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवारांच्या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहित पवार यांनी स्पष्टपणे नकार दिला.

ते म्हणाले की, विलिनीकरणाबाबत तेही काही बोलले नाहीत आणि मीही काही बोललो नाही. सुप्रिया ताई किंवा साहेबांना याबाबत माझ्याशी चर्चा करायची असती, तर त्यांनी केली असती. माझ्याशी अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा केवळ माध्यमांमध्ये आणि अजितदादांच्या पक्षात सुरू असल्याचं दिसतं, असं ते म्हणाले. तसंच अजित पवारांच्या पक्षातून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोनच नेते विलिनीकरणाबाबत राजकीय वक्तव्य करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

आधी या दोन्ही नेत्यांनी विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नसल्याचं सांगितलं होतं. हे लोक पक्ष चोरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद हवं होतं. त्यांच्या पक्षात या दोन नेत्यांचं कितपत चालतं, याबाबतही प्रश्न आहे. आता त्यांच्या तोंडून खरं वक्तव्य आलं, असं म्हणावं लागेल, अशी टीका रोहित पवार यांनी केली. मात्र विलिनीकरणाला आपला विरोध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

रोहित पवार म्हणाले की, अजितदादांचा पक्ष भाजपची साथ सोडून बाहेर येत असेल, तर विलिनीकरण करायला काही हरकत नाही. कोणाला कोणतं पद घ्यायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं काही म्हणणं नाही. मात्र आम्ही भाजपसोबत जाणार नाही. सुरुवातीपासूनच आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, असं रोहित पवार म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us