भाजपचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, शिंदेंसह त्यांच्या मुलाबद्दलची तुमची क्लिप आम्ही…; रामदास कदमांना मोठा इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. त्यातच आता महायुतीमध्ये बिघाड होतो की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे. आता प्रसाद लाड यांनी रामदास कदमांना आक्रमक शैलीमध्ये उत्तर दिलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय?

मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. या क्लिपमुळे महायुतीमध्ये मोठा बिघाड झाला आहे. आज रामदास कदम यांनी भाजप एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापू पाहत आहे, असा आरोप करत प्रसाद लाड यांचे काही फोटो पत्रकार परिषदेत दाखवले होते. त्यानंतर भाजपने मोठी आक्रमक भूमिका घेत आता रामदास कदमांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुपारी प्रवीण दरेकरांनी सडेतोड उत्तर दिल्यानंतर आता भाजप नेते आणि मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रसाद लाड यांनी रामदास कदमांना आक्रमक शैलीमध्ये उत्तर दिलं आहे.
रामदास कदमांना फालतू काम बंद करावं. आम्ही महायुती म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मागे खंबीरपणे उभा होतो. महायुतीचं कर्तव्य काय आहे, हे तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात, म्हणून शिंदे साहेब तुमचा आदर करतात. पण मागून तुम्ही याच शिंदे साहेबांबद्दल आणि त्यांच्या मुलाबद्दल काय बोलता याच्या क्लिपजर आम्ही उघड केल्या तर तुम्हाला तुमची जागा निश्चितपणे कळेलं, हे मी तुम्हाला सांगतो, असं म्हणत त्यांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना या ऑडिओ क्लिपची माहिती दिली. मु्ख्यमंत्र्यांनी भूमिका घेत सायबर क्राइमला या क्लिपची चौकशी करण्यासाठी आदेश दिले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर आरोप केले. प्रसाद लाड जरांगे पाटलांना भेटले वगैरै. भाजप एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्याबरोबर जेवले, असे अनेक आरोप त्यांनी केले. मी त्या आरोपांचं खडन करतो.
शिंदेंनी समज द्यावी…
शिंदे साहेबांना एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आम्ही प्रामाणिकपणे एका मध्यस्थाची भूमिका पार पाडली. प्रत्येकवेळी आंदोलन मागे घ्यावं यासाठी प्रयत्न केला. अनेक नेते यामध्ये होते, विखे पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, मकरंद आबा यांनी हे प्रयत्न केले, पण जर रामदास कदम भाजपला बदनाम करणार असतील तर आम्ही हे सहन करणार नाही. शिंदे साहेबांनी त्यांना समज दिली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं यावेळी प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
