Maharashtra Rain: कुठे रस्त्यांवर पाणी, तर कुठे शेतीला दिलासा! महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कुठे-कुठे बरसला? जाणून घ्या जिल्हानिहाय स्थिती

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हिंजवडीतील रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain: कुठे रस्त्यांवर पाणी, तर कुठे शेतीला दिलासा! महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कुठे-कुठे बरसला? जाणून घ्या जिल्हानिहाय स्थिती
Maharashtra Weather Rain Update
| Updated on: Nov 01, 2026 | 8:35 PM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच आज अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे, अहिल्यानगर, सातारा आणि बीड जिल्ह्यांतील काही भागांत पावसाच्या सरी बरसल्या. कुठे जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले, तर कुठे पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पुण्यातील आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात आज संध्याकाळी दमदार पावसाने हजेरी लावली.

अचानक आलेल्या पावसामुळे आयटी पार्क परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात संध्याकाळपासून ढगाळ वातावरण होते. याच वातावरणादरम्यान शहरातील काही भागांसह हिंजवडीत अवकाळी पाऊस बरसला. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.

Loading...

गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या उकाड्याचा सामना करणाऱ्या जामखेडकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. शहरातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे परिसरातील तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. सातारा शहर आणि ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहू लागले.

या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतातील ऊस आणि ज्वारीच्या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा, कडा आणि परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या. रविवारी दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

मात्र, हा पाऊस पुरेसा नसून आणखी पाऊस व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. एकंदरीत राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनाही काहीशी आशा निर्माण झाली आहे. मात्र पुढील काळात पावसाची साथ कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us