अन् पांढरी पिंपळगावातून झाली 1972 च्या दुष्काळाची घोषणा, इंदिरा गांधींच्या संभाजीनगर भेटीची आठवण ताजी!

Maharashtra 1972 Drought : 1972 सालच्या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राला दिलेली भेट आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जिल्ह्यातील पांढरी पिंपळगाव येथील भेट आजही ऐतिहासिक मानली जाते.

अन् पांढरी पिंपळगावातून झाली 1972 च्या दुष्काळाची घोषणा, इंदिरा गांधींच्या संभाजीनगर भेटीची आठवण ताजी!
indira gandhi and maharashtra drought (संग्रहित, सांकेतिक फोटो)
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 29, 2026 | 4:27 PM

संदीप जाधव, टीव्ही 9 मराठी : महाराष्ट्रात सध्या दुष्काळ पडलाय. साधारण 75 टक्के भागात पावसाने दडी मारल्याने पिके हातातून गेली आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आता सरकारदरबारी साकडं घातलं जातंय. सरकारने दुष्काळ जाहीर केलेला असला तरीही अद्याप शेतकऱ्यांन थेट मदत मिळालेली नाही. दरम्यान, आता राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर 1972 सालच्या भीषण दुष्काळाच्या आठवणीत पुन्हा नव्याने ताज्या झाल्या आहेत. या दुष्काळात लोकांचे झालेले हाल, सरकारने देऊ केलेली मदत काय होती, याबाबत विचारलं जातंय. सोबतच 1972 साली दुष्काळ जाहीर झाला तेव्हा नेमकं काय घडलं होतं? याबाबतही विचारलं जातंय. 1972 सालच्या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राला भेट दिली होती.

इंदिरा गांधींनी दिली होती पांढरी पिंपळगावला भेट

महाराष्ट्रातील 1972 सालचा भीषण दुष्काळ हा राज्याच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी काळ होता. या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राला दिलेली भेट आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जिल्ह्यातील पांढरी पिंपळगाव येथील भेट आजही ऐतिहासिक मानली जाते. 1972 सालच्या दुष्काळाची भीषणता प्रत्यक्ष पाहण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. दौऱ्यादरम्यान त्यांनी औरंगाबाद जवळील पांढरी पिंपळगाव येथील दुष्काळी कामांना व गावाला भेट दिली. तिथे त्यांनी एका गरीब वृद्ध महिलेच्या घरी भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेतली होती.

Loading...

इंदिरा गांधींनी दिल्लीला फोन केला अन्…

इंदिरा गांधी यांनी ज्या घराला भेट दिली होती त्या  घरात खायला अन्न नव्हते. त्या कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी जंगलातील, शेतशिवारातील निकृष्ट दर्जाच्या धान्यापासून (ज्याला स्थानिक भाषेत ‘बरबड्याचे धान्य’ म्हटले जाते) बनवलेली काळी-कुट्ट भाकरी इंदिरा गांधी यांच्यासमोर ठेवली होती. ती निकृष्ट आणि कडक भाकरी पाहून इंदिरा गांधी अत्यंत हेलावून गेल्या. येथील नागरिक एवढ्या हलाखीत जगत आहेत आणि त्यांना पोटासाठी हे खावे लागत आहे, हे पाहून त्यांनी तत्काळ दिल्लीला संपर्क साधला आणि महाराष्ट्रासाठी 10 हजार टन धान्य मंजूर करून तातडीने पाठवण्याचे आदेश दिले.

 1972 च्या दुष्काळाचे स्वरूप, तीन वर्षे पावसाची ओढ

महाराष्ट्रात सलग तीन वर्षे पाऊस न पडल्यामुळे हा ‘महादुष्काळ’ निर्माण झाला होता. शेतातील पिके पूर्णपणे जळून खाक झाली होती आणि विहिरी, नद्या कोरड्या पडल्या होत्या. दुष्काळातून लोकांच्या हाताला काम देण्यासाठी वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून ‘रोजगार हमी योजना’ (रोहयो) सुरू झाली. लोकांनी रस्ते बांधणे, खडी फोडणे आणि पाझर तलाव खोदण्याचे काम केले. लोकांमध्ये कुपोषण टाळण्यासाठी मफतलाल ग्रुप आणि सरकारच्या मदतीने दुष्काळी कामांवर ‘सुखडी’ (पौष्टिक अन्न) चे वाटप केले गेले, ज्याने लाखो लोकांचे प्राण वाचवले.पांढरी पिंपळगाव येथील इंदिरा गांधींची ही भेट आणि त्या कठीण काळातील ‘बरबड्याच्या भाकरीचा प्रसंग’ आजही महाराष्ट्राच्या दुष्काळी इतिहासात संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण मानला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us