
“आतापर्यंत असे अनेक अपघात या महाराष्ट्रात आणि देशात झाले आहेत. त्या चौकशीचे आदेश DGCA ने दिले आहेत. त्या सगळ्या चौकश्यांच पुढे काय झालं? हा कालच्या अजित पवारांच्या अपघातानंतर निर्माण झालेला प्रश्न आहे. आतापर्यंत असे अनेक अपघात झालेले आहेत, चार्टर फ्लाइटचे, अहमदाबादला बोईंग विमान पडलं. असंख्य लोक त्यात मारले गेले. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या चौकश्या तुम्ही ज्या डीजीसीए मार्फत करता, त्याचं पुढे काय होतं?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “ज्या कंपन्यांची विमानं आम्ही सगळेच वापरतो, खासकरुन निवडणुक काळात अशा अनेक कंपन्यांकडून विमानं घेतली जातात. मग ते पायलट, तंत्रज्ञ, त्यांचं क्वालिफिकेशन याची तपासणी, चौकशी वैधता करणं हे डीजीसीएच काम आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“बारामतीमध्ये यापूर्वी सुद्धा अनेक विमानं उतरली आहेत. बारामतीच्या त्या छोट्या विमानतळावर अजित पवार अनेकदा उतरले आहेत.पण काल ज्या विमानात बिघाड झाला, विजिबलिटी नाही असं दिसतय. विमानाने दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला. पण विमानं भरकटलं असं दिसतय. यात टेक्निकल आणि इतर फॅक्ट्स याचा तपास डीजीसीए करेल.शरद पवार यांनी संपूर्ण खुलासा, निवेदन दिलेलं आहे ते बरोबर आहे” असं संजय राऊत म्हणाले.
ब्लॅक बॉक्समधून अनेक गोष्टींचा उलगडा होईल
“महाराष्ट्रात आणि देशात अशा अनेक अपघातांच्या चौकशांच्या घोषणा झालेल्या आहेत. पुढे त्या चौकशीातून काय निष्पन्न झालं? माझ्या माहितीप्रमाणे माधवराव शिंदेंपासून असे अनेक अपघात पाहिले आहेत. अनेक महत्वाच्या लोकांचा मृत्यू झाला आहे.त्यांचं पुढे काय झालं? याचा कधीही अहवाल हा देशासमोर आला नाही. निदान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानात नेमका कोणता बिघाड झाला, नेमकं त्यावेळी काय झालं, ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. ब्लॅक बॉक्समधून अनेक गोष्टींचा उलगडा होईल” असं संजय राऊत म्हणाले.
ते विमानाने ताबडतोब निघून जातात
“पायलट आणि कोपायलट अनुभवी होते. तांत्रिक कारणामुळे अपघात झाला आहे. डीजीसीएने माहिती समोर आणली पाहिजे. भविष्यात अशा प्रकारचे विमान अपघात होऊ नयेत. राजकारणी अशा प्रकारची विमानं वापरतात. राजकारण्यांना वेळ नाहीय. पूर्वी लोक ट्रेनने प्रवास करायचे. रस्त्याने जायचे. आता राजकारणी घाईत असतात. ते विमानाने ताबडतोब निघून जातात. पण त्या विमानाची कंडीशन, पायलट अशा अनेक गोष्टी चर्चेत आल्या आहेत” असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे रस्तेमार्गाने बारामतीला आले
“अजित पवार यांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. अजितदादांसारखा उमदा नेता गेला. महाराष्ट्राची जनता हे गांभीर्याने घेणार. इतर नेते जे घाईघाईने प्रवास करतात ते चिंतेत असणार. राज्याचे मुख्यमंत्री प्रवास करतात. उपमुख्यमंत्री शिंदे सातत्याने विमानात असतात. दौऱ्यावर असतात. सातारा, दिल्लीला जात असतात. विमानाशिवाय फिरत नाहीत. काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बारामतीत पोहोचले. मुंबईतून रस्तेमार्गाने ते बारामतीला आले” असं संजय राऊत म्हणाले.