
करवीर निवासिनी अंबाबाई आणि दख्खनच्या जोतिबाला नमन करतो, मी दोन वेळा नगरसेवक होतो, नागपूरचा महापौर देखील होतो. ज्याने पाप केलं तो नगरसेवक आणि महापाप केलं तो महापौर असतो. कारण शहरात कुठं काहीही झालं की पहिला नगरसेवक आणि नंतर महापौर यांना विचारलं जातं. जे सेवक म्हणून पाहिलं तर योग्य ठरतं, माझ्या शिवाय वार्डातून सुई देखील हलवता येणार नाही ही जी काही नगरसेवकांची मानसिकता असते ती चुकीची आहे. शहराचं नियोजन आधी फारसं होत नव्हतं, परंतु ग्रामीण भागातून नागरिक शहरात येत राहिले. संख्या वाढत राहिल्याने अव्यवस्था निर्माण झाली. सर्वात आधी मोदींनी शहराला निधी देण्यास सुरुवात केली, सर्व सुविधा शहरात असल्याने लोक शहरात येऊ लागले. मोदींनी शहरांसाठी अनेक योजना आणल्या असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूर शहरात भेडसावणारे मुद्दे या पाच वर्षात आपण सोडवू शकतो. पर्यावरण, जल शुद्धीकरण आणि हवा प्रदूषण हे प्रश्न सोडवावे लागणार आहेत. पूर्वीपासून हे सर्व क्षमता असलेले शहर आहे. 700 कोटी रुपयांचा टोल मी मुख्यमंत्री असताना घालवला. हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक निर्णय होता. कोल्हापूर शहराला वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. कोल्हापूरमध्ये आता हळूहळू विकासाचा बदल पहायला मिळतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातील गुंतवणूक आता कोल्हापूरमध्ये यायला सुरुवात झाली आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान रॅपीड फायर प्रश्नाला उत्तर देताना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील मोठं विधान केलं आहे. मी जर राजकारणात नसतो तर चांगला वकील झालो असतो, एकनाथ शिंदे जर राजकारणात नसते तर ते चांगले सामाजिक संस्था किंवा युनियन लीडर झाले असते. अजित पवार जर राजकारणात नसते तर ते उत्तम शेतकरी झाले असते, किंवा पोलीस अधिकारी झाले असते कारण ते सर्वांना धाकात ठेवतात, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.