Raghav Sharma: रोहित पवारांनी दाखवलेल्या व्हिडिओत देवेंद्र फडणवीसांसोबत दिसणारा ‘राघव शर्मा’ नेमका कोण? फडणवीस कुटुंबासोबत कनेक्शन काय?
Rohit Pawar Press Conference: आमदार रोहित पवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांचा मृत्यू आणि विमान अपघातासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.

अजित पवार यांच्या विमान अपघातामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय गदारोळ माजला आहे. रोहित पवारांनी या अपघातामागील कट आणि त्यात सामील असलेल्यांचे संरक्षण करणाऱ्या कथित ‘मफलर घालणाऱ्या नेत्या’चे नाव उघड केले आहे. आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत ‘मफलर मॅन’ची ओळख उघड केली आहे. मफलर मॅन म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला आहे. यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. राघव शर्मासोबत देवेंद्र फडणवीसांचा मफलर घालून चालत असतानाचा फोटो दाखवला. यानंतर आता राघव शर्मा कोण असा सवाल उपस्थित झाला आहे. त्याची माहिती आणि फडणवीस कुटुंबाशी असलेले कनेक्शन समोर आले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त करत रोहित पवार यांनी सांगितले की, हा अपघात नसून एक हेतुपुरस्सर रचलेला कट होता. ‘मफलर मॅन’चा अजित पवार यांच्या अपघाताशी थेट संबंध नाही, परंतु ज्या कंपनीने अजित पवार यांचे विमान उडवले होते. त्या ‘व्हीएसआर एव्हिएशन’चे मालक आणि सहचालक रोहित सिंग यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. रोहित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित सिंग यांचा एक फोटो प्रसिद्ध केला आहे. त्यांनी म्हटले की, हा फोटो एका कार्यक्रमातील आहे.
आमदार रोहित पवार यांनी दाखवलेल्या एका व्हिडिओमुळे राघव शर्मा हे नाव चर्चेत आले आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राघव शर्मा दिसत असल्याचा दावा केला जात आहे. राघव शर्मा हे बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्याकडे सहाय्यक म्हणून केली.
त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत कास्टिंग डायरेक्टर आणि निर्माता म्हणून काम केले. ‘हेट स्टोरी 4’ यांसारख्या चित्रपटांशीही त्यांचे नाव जोडले गेले आहे. राघव शर्मा यांच्या प्रोडक्शनशी संबंधित कामांमध्ये 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या हर्षवर्धन राणे अभिनीत ‘एक दीवाने की दीवानियत’ या चित्रपटाचा समावेश आहे. याशिवाय, ‘गुली माता’ या लोकप्रिय म्युझिक व्हिडिओच्या निर्मितीशीही त्यांचा संबंध आहे. या गाण्यात श्रेया घोषाल आणि मोरोक्कन गायक साद लामजार्रेद यांनी आवाज दिला आहे.
‘होमा डोल’ यांसारख्या म्युझिक व्हिडिओंच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग असल्याची नोंद आहे. मनोरंजन विश्वात राघव शर्मा यांचे नाव अभिनेत्री अवनीत कौरसोबतच्या कथित नात्यामुळेही चर्चेत आले होते. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राघव शर्मा यांचे नाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने चर्चेत आले आहे. विशेषतः अमृता फडणवीस आणि राघव शर्मा यांच्यात सामाजिक तसेच मनोरंजन क्षेत्राशी संबंधित ओळख असल्याचे सांगितले जाते.
अमृता फडणवीस या गायिका असून संगीत आणि मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. राघव शर्मा यांच्या म्युझिक लेबलशी संबंधित काही कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतल्याचेही समोर आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर राघव शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या या उपस्थितीची त्यावेळी विशेष चर्चा झाली होती.