तुकाराम मुंढेंचा आवडता मुख्यमंत्री कोण? फडणवीस, शिंदे की ठाकरे? पाहा काय म्हणाले?
तुकाराम मुंढे यांची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे, त्यांच्या कामाचं कौतुक होत आहे. दरम्यान त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं आहे.

सध्या तुकाराम मुंढे यांची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे, ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून एफडीएकडून कामाचा धडका सुरू आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात येत आहेत. दरम्यान त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांना एका मुलाखतीमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, की एकनाथ शिंदे या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी या मुलाखतीमध्ये थेट कोणाचंही नाव घेतलं नाही, त्यांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं आहे. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील पोस्टिंगच्या अनुभवाच्या संदर्भाने हा प्रश्न विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना मला तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटतो, एवढंच उत्तर त्यांनी दिलं.
दरम्यान या मुलाखतीमध्ये बोलताना आता खानपानाच्या गुणवत्तेत तडजोड खपवून घेतील जाणार नाही, असा इशाराही यावेळी तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमध्ये भेसळीच्या तक्रारी वाढल्या असून, गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पुण्यात घडल्या आहेत. पेयजलांची गुणवत्ता, त्याचे उत्पादन आणि लेबलिंग यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. दूध, पनीर, खाद्यतेलांप्रमाणेच ‘अल्कोहोलिक’ आणि ‘नॉन अल्कोहोलिक’ पेयांचीही तपासणी करणार असून, खानपानाच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असं यावेळी मुंढे यांनी म्हटलं आहे.
तरुणांना काय दिला सल्ला?
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने, सद्विवेक आणि अंतरात्म्याला ‘फॉलो’ केले पाहिजे. केवळ प्रवाहासमवेत न वाहता समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्ला यावेळी तुकाराम मुंढे यांनी आजच्या तरुण पिढीला दिला आहे.
‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांनी मुंढे यांची ही मुलाखत घेतली आहे, या कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.