धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद कोणी नाकारलं? अखेर सुनील तटकरेंनी मौन सोडलं

शनिवारी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली, मात्र यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद कोणी नाकारलं? अखेर सुनील तटकरेंनी मौन सोडलं
| Updated on: Jan 19, 2025 | 3:51 PM

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांना खाते वाटप झालं. मात्र पालकमंत्रिपदाचं वाटप रखडलं होतं. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर शनिवारी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली आहे. धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा बीडचं पालकमंत्रिपद मिळणार का?  याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र धनंजय मुंडे यांचं नावच पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. बीडचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. अजित पवार हे पुण्यासोबतच आता बीडचे देखील पालकमंत्री असणार आहेत.

दरम्यान गेल्यावेळी मंत्री धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र यावेळी त्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंनी बीडमध्ये प्रदीर्घकाळ काम केलं आहे. कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद द्यायाचं? याचा निर्णय महायुतीच्या तीन्ही पक्षातील प्रमुखांनी बसून निर्णय घेतला आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

बीडच्या मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. यावरून विरोधकांकडून देखील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा बीडचं पालकमंत्रिपद दिलं जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये, बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच ठेवण्यात आले आहे. अजित पवार हे बीडचे नवे पालकमंत्री असणार आहेत. तर पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया   

दरम्यान बीडची सध्याची स्थिती पाहून मीच दादांना विनंती केली, बीडच्या पालकमंत्रिपदाची  जबाबदारी घ्यावी म्हणून . जसा पुण्याचा विकास झाला तसाच बीडचाही व्हावा. ही माझी भावना आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.