
Beed Pregnancy News : महिलेची प्रसूती व्यवस्थित होणे म्हणजे एका प्रकारे तिचा पुनर्जन्मच असतो. प्रसूतीच्या प्रक्रियेत काही वैद्यकीय अडचणी आल्या तर मात्र डॉक्टरांना त्यांचे कौशल्य वापरून बाळ आणि आईचा जीव वाचवावा लागतो. कधीकधी मात्र प्रसूतीबाबत अजब चमत्कार पाहायला मिळतात. सध्या एक फारच विदारक आणि थक्क करणारी घटना घडली आहे. बीड शहरात एका महिलेची थेट कारमध्येच प्रसूती झाली आहे. महिला प्रसूत झाल्यानंतर कारमधील रक्त पाहून कारचालकाला थेट चक्कर आली आहे. त्यानंतर कारचा अपघात झाला आहे.
बीड शहरात सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीडमधील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच हा विचित्र अपघात घडला. शहरातील कॅनाल रोडवर राहणाऱ्या एका महिलेला पहाटे अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची कारमध्ये प्रसूती झाली. खासगी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
यानंतर बाळ, माता आणि इतर दोन महिला आणि चालक असे पाचजण जिल्हा रुग्णालयाकडे जात होते. मात्र हा प्रवास चालू असतानाच पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कारमधील रक्त पाहून चालकाला अचानक चक्कर आली. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला काम सुरू असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. काही समजायच्या आत हा अपघात झाला. चालकाला भोवळ आल्याने हा ही दुर्दैवी घटना घडली. चांगली बाब म्हणजे नुकतेच जन्मलेल्या बाळाला, प्रसूत झालेल्या मातेला गंभीर अशी इजा झाली नाही. कारमध्ये असलेल्या इतर महिलांनाही फार गंभीर दुखपात झालेली नाही. कारचा अपघात झालेला असला तरी बाळ आणि आई सुरक्षित असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.